चंद्रपूर :अवैद्य वन्यजीव व्यापारातून किंवा बंदीवासातून मुक्त करण्यात आलेल्या स्टार कासवांवर महाराष्ट्रातील कासव पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत उपचार जिवनदान देण्यात येते.अशाच ४४१ स्टार कासवांपैकी मध्य चांदा वनविभागांतर्गत राजुरा वनपरिक्षेत्रातील राखीव जंगलात आज शनिवारी (५ एप्रिल) ३४० स्टार कासवांवर उपचार करून निसर्गमुक्त करण्यात आले. महाराष्ट्र वनविभाग आणि रेस्क्यू (RESQ) चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात कासव पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येत आहे. यामध्ये अवैध व्यापारातून किंवा बंदिवासातून मुक्त झालेल्या कासवांना ठवेल्या जाते. त्यांचेवर उपाय योजना करून त्यांना जिवदान देण्यात येते. मागील काही महिन्यांत ४४१ भारतीय स्टार कासवांना या प्रकल्पात दाखल करण्यात आले होते. यामध्ये अनेकांची तब्येत गंभीर होती. जंगालत सोडण्यात आलेल्या स्टार कासंवापैकी 340 कासवांवर वैद्यकीय उपचार,अलग ठेवण्याची प्रक्रिया आणि नैसर्गिक वातावरणाशी एकरूप होण्याचे सर्व टप्पे कासवांवर सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत.
उर्वरित कासवांचे लवकरच उपचार करून पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राखीव जंगल स्टार कासवांचे सुरक्षित निवास्थान म्हणून उदयास येत आहे.पुण्यातील बवधन येथील वन्यजीव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये कासवांच्या नैसर्गिक जीवनशैलीच्या जवळ जाणारे पुनर्वसन वातावरण तयार करण्यात आले. अनेक कासवांना अत्यंत निकृष्ट परिस्थितीत कैदेत ठेवण्यात आले होते. जिथे योग्य आहार, मोकळी जागा किंवा सूर्यप्रकाश नव्हता.त्यामुळे त्यांना पोषण पोषणताट्यतेपासून हालचालींचे अडथळे आदी प्रकारच्या समस्या उद्भवल्या होत्या. कासवांच्या आकार व लिंगानुसार गट तयार करून त्यांची काळजी आणि निरीक्षण अधिक प्रभावी पद्धतीने करण्यात आले.
पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात वैद्यकीय उपचार, स्थिरीकरण आणि निगराणीखाली अलग ठेवण्याची व्यवस्था होती. त्यानंतर हळूहळू त्यांना अर्ध-नैसर्गिक बाह्य अधिवासात स्थलांतरित करण्यात आले. यामध्ये स्थानिक गवत आणि हंगामी वनस्पतींचा समावेश असलेल्या आहारावर त्यांना ठेवण्यात आले होते. त्यामुळे पचनसंस्थेचे आरोग्य सुधारले जाईल आणि नैसर्गिक खाद्य वर्तन पुन्हा निर्माण होईल. विशेष लक्ष किरणोत्सर्ग (UV) आणि शरीराच्या तापमान नियंत्राणावर देण्यात आले, यासाठी विशिष्ट उन्हात बसण्याचे आणि सावलीतील विश्रांती क्षेत्र तयार करण्यात आले होते. या पुनर्वसन प्रक्रियेत कासवांना कैदेतून जंगलातल्या नैसर्गिक वातावरणात सामावून घेण्यावर विशेष भर देण्यात आला, ज्यामध्ये हवामानाची सवय होणे आणि नैसर्गिक वर्तनांची पुनर्बहाली यांचा समावेश होता. वजन, कवचाची गुणवत्ता, पाण्याचे प्रमाण यासारख्या नियमित जैवमितीय मापनांद्वारे आणि खाणे, हालचाल व सामाजिक वर्तन यांचे निरीक्षण करून त्यांची प्रगती सातत्याने तपासण्यात आली.
प्रत्येक कासवाच्या गरजेनुसार उपचार देण्यासाठी अनुभवी वन्यजीव चिकित्सक आणि पुनर्वसन तज्ञांची टीम अहोरात्र काम करत होती. विशेषतः नैसर्गिक आहार, स्थानिक गवत व ऋतुपरत्वे बदलणाऱ्या वनस्पती, शरीराच्या उष्णतेचे व्यवस्थापन या बाबींवर भर देण्यात आला. परिणामी, बहुसंख्य कासवांमध्ये हालचालीत सुधारणा व नैसर्गिक आहाराच्या सवयी विकसित झाल्याचे निरीक्षणात आढळून आले. या कासवांनी पुण्याहून चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत सुमारे ९०० किमीचा प्रवास केला. त्यांना सेंट्रल चंदा राजूरा वनपरिक्षेत्रातील राखीव जंगलात सोडण्यात आले. या ठिकाणी ही प्रजाती नैसर्गिकरित्या आढळते व अधिवास देखील सुरक्षीत आहे. या पूर्वी येथे झालेल्या लहान प्रमाणातील पुनर्स्थापनांमुळे वन अधिकाऱ्यांनी वारंवार दर्शन, प्रजननाची लक्षणे आणि लहान कासवांचे निरीक्षण केले आहे.
आज शनिवारी स्टार कासवांना निसर्गमुक्त करण्याची मोहीम आदर्श विद्यालय, राजूरा येथील सुमारे १०० विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागात पूर्ण झाली. यावेळी मध्य चांदा वनविभागाचे उपवरसंरक्षक श्रीमती श्वेता बोड्डू, उपविभागीय वन अधिकारी पवन जोंग, सहाय्यक वनसंरक्षक आदेश शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येल्केवाड व स्थानिक वन कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
काही वर्षांपासून अशा अनेक बॅचचे पुनर्स्थापन मी पाहिले आहे. या प्रजातींची त्यांच्या मूळ अधिवासात पुनःस्थापित झाल्यानंतरची जुळवून घेण्याची क्षमता आणि तग धरायची ताकद यावर महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. आगामी बॅचसाठी आम्ही नाविन्यपूर्ण टॅगिंग प्रणालीवर काम करत आहोत. ज्यामुळे कासवांच्या हालचाली व वर्तनाचे अधिक परिणामकारक निरीक्षण करता येईल आणि भविष्यातील संवर्धनासाठी उपयोगी ठरणारी माहिती मिळू शकेल.
जितेंद्र रामगावकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर
ही पुनर्स्थापना केवळ एक घटना नसून, विज्ञानावर आधारित, कल्याण-केंद्रित संवर्धनाचा आदर्श ठरतो आहे. महाराष्ट्राने वन्यजीव व्यापाराचा सामना केवळ कडक कारवाईनेच नाही, तर दीर्घकालीन पुनर्बहाली आणि जंगलात पुनर्वापसीच्या दृष्टिकोनातून केला आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे. श्वेता बोड्डू, उपवनसंरक्षक, मध्य चंदा वनविभाग, चंद्रपूर