नागपूर : पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीने त्याच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले आणि फरार झाली. ही खळबळजनक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत घडली. धीरज भीमराव जयपुरे (४४) रा. विठ्ठलनगर, असे जखमी पतीचे नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी पत्नी किरण जयपुरे (२७) विरुद्ध गुन्हा नोंदवून शोध सुरू केला आहे.

धीरज आणि किरण दोघेही घटस्फोटीत होते. तीन वर्षांपूर्वी त्यांची भेट झाली आणि दोघांनीही लग्न केले. दोघांनाही पहिल्या लग्नापासून एक-एक मुल आहे. लग्नाच्या काही दिवसांपासूनच किरण धीरजच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडू लागली. रोज त्यांच्यात भांडण होत होते. जवळपास एक वर्षापूर्वी किरण घर सोडून गेली होती. कुटुंबीयांच्या मध्यस्थीनंतर गत १ डिसेंबरला ती घरी परतली. धीरज भाजी विक्रेता आहेत. गुरुवारी सायंकाळी ते भाजी विकून घरी परतले. समोरच्या खोलीत पलंगावर लेटून मोबाईल पहात होते. दरम्यान किरण तेथे आली. एखाद्या महिलेशी ‘चॅटिंग’ करीत असल्याच्या संशयातून प्रचंड संतापली. रागात तिने घरात ठेवलेले अ‍ॅसिड आणून धीरजच्या अंगावर फेकले. यात धीरज गंभीररित्या भाजल्या गेले.

हेही वाचा – नागपूर : पती एचआयव्हीग्रस्त असूनही थाटला संसार, समलैंगिक असल्याचे समजताच…

हेही वाचा – चंद्रपूर : ४७३ गावांना ५९ हजार ४५९ हेक्टर वनहक्क दावे प्राप्त

किरण घरातून फरार झाली. धीरजने घटनेची माहिती पोलिसांना दिली. हुडकेश्वर पोलीस घटनास्थळावर पोहोचले. धीरज यांना उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात भरती केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरजच्या शरीराचा काही भाग अ‍ॅसिडमुळे जळाला आहे, मात्र तो धोक्याबाहेर आहे. पोलिसांनी किरण विरुद्ध गुन्हा नोंदवून शोध सुरू केला आहे.

Story img Loader