वर्धा : उष्माघाताने केवळ मनुष्यच नव्हे तर वन्य व पाळीव प्राणीही संकटात सापडत असल्याचे दिसून येत आहे. अतिप्रखर सूर्यप्रकाश असल्यास जनावरांना तडक्या या रोगाची बाधा होते. त्यात जनावरांची त्वचा फाटून निघते. भेगा पडतात. प्रजनन क्षमता कमी होते. दुधात हमखास घट होण्याचा प्रकार होतो. भूक मंदावते. अपचनाचा त्रास वाढतो. हे टाळण्यासाठी पशुपालकांनी जनावरांची काळजी घेणे अपेक्षित आहे.
थंड पाण्याने पशूंना धुवून काढावे. दोन्ही शिंगात ओले कापड ठेवावे. भरपूर थंड पाणी नियमित अंतराने पाजावे. गूळ मिश्रित खाद्य द्यावे. त्यांना एकत्र डांबून ठेवू नये. गोठ्यावर चारा किंवा उसाचे पाचड अंथरावे, अशा सूचना पशुपालन विभाग देत आहे. तसेच आवश्यक औषधी व अन्य उपाय करण्यासाठी एक कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘गण गणात बोते, आता विदर्भ होते’, शेगावात स्वतंत्र राज्यासाठी महाराजांना साकडे
पशुवैद्यकीय दवाखान्यात आवश्यक शेड उभारल्या जात आहे. जिल्हा परिषदेचे पशू संवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार बिडकर म्हणाले की, चाळीस डिग्रीवर तापमान जात असल्यास जनावरांना मोठा धोका संभवतो. म्हणून लगतच्या पशू वैद्यकीय दवाखान्यात त्वरित तपासणी करून घेतली पाहिजे.