लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ : जिल्ह्यात कीटक व जलजन्य आजारांची साथ सुरू आहे. डेंगी, मलेरीया, टायफफाईड आजाराचे रुग्ण उपचारासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येत आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढल्याने बाह्यरुग्ण विभाग हाऊसफुल्ल झाला आहे.

गोरगरीबांवर उपचार करण्यासाठी हक्काचे म्हणून ओळखल्या जाणार्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बाह्यरुग्ण विभागात डॉक्टरांकडून तपासणी केली जाते. मात्र, औषधीसाठी खासगी दुकानाचा रस्ता दाखविला जात असल्याने रुग्णांची परवड होत असल्याची ओरड सुरू आहे. डेंगी, मलेरीया, टायफाईडसह सर्दी, खोकला आणि ताप आदी आजारांचे रुग्ण उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात येत आहेत. बाह्यरुग्ण विभागात दररोज ७०० ते ८०० रुग्णांची नोंद होत आहे. त्यांची तपासणी केल्यावर गंभीर आजारी रुग्णांना वार्डात भरती केली जाते.

आणखी वाचा-डॉ. आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर उद्धाटन झाल्यानंतरही बंद का?

डॉक्टरांकडून रुग्णांच्या हातात औषधाची चिठ्ठी दिली जाते. औषधी घेण्यासाठी गेल्यास एखादं औषध देऊन बोळवण केली जाते. उर्वरित औषध खासगी दुकानातून घेण्याचा सल्ला दिला जातो. बाहेरही औषध घेणार्‍यांची गर्दी उसळल्याचे बघावयास मिळते. भरती असणार्‍या रुग्णांच्या बाबतीतदेखील हेच चित्र बघावयास मिळते. कमी खर्चात उपचार होईल, या अपेक्षेने आलेल्या रुग्णांच्या खिशाला आर्थिक सोसावी लागत आहे. कोणत्याही प्रकारच्या औषधासाठी बाहेर पाठविले जात नाही. एखाद औषध उपलब्ध नसल्यास बाहेरून विकत घेण्याचा सल्ला दिला जातो, असेही डॉक्टरांकडून सांगितले जाते.

दाद कुठे मागायची?

शासकीय महाविद्यालयात सुविधांचा अभाव आहे. स्वच्छतेच्या संदर्भात मेडीकल प्रशासनानेही डोळे मिटले आहेत. रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. डॉक्टर सोडाच साधे कर्मचार्‍यांना विचारणा केल्यास टोलवाटोलवी केली जाते. त्यामुळे दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्‍न रुग्णांकडून उपस्थित केला जात आहे.

कोट्यवधींच्या यंत्रसामूग्रीचे तुणतुणे

वैद्यकीय महाविद्यालयात नुकतेच कोट्यवधी रुपये खर्च करून चार मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन करण्यात आले. कोट्यवधी रुपयांच्या यंत्रसामूग्रीचे तुणतुणे येथील प्रशासनाकडून नेहमीच वाजविले जाते. प्रत्यक्षात साध्या एका गोळीसाठी रुग्णांना बाहेर वणवण भटकंती करावी लागते. त्याचाही परिणाम मेडीकलच्या प्रतिमेवर होत आहे. याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Outpatient department at yavatmal medical college is full advice to purchase from private as there is no medicine nrp 78 mrj