बुलढाणा : प्रतिबंधक कारवाईमधील आरोपीस क्रिकेटच्या बॅट ने अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसाची चित्रफीत सध्या समाज माध्यमावर वेगाने सार्वत्रिक होत आहे. दरम्यान, या प्रकाराबद्दल नेटकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून हा महाराष्ट्र आहे की यूपी- बिहार असा सवाल विचारला जात आहे.
या दृश्यफितीमधील पोलीस आरोपीस ठाण्याच्या फरशीवर झोपवून त्याच्या पायाच्या तळव्यावर बॅटने दणादण मारत असल्याचे व तो व्यक्ती वेदनेने तळमळत असल्याचे दिसून येत आहे. तसेच समोर असलेल्या व्यक्तीशी( फिर्यादीसोबत?) अधूनमधून बोलत असल्याचे दिसत आहे. तसेच खाली बसलेल्या व्यक्तीच्या गालफडात हाताने मारत असल्याचे दिसते.
हेही वाचा…चंद्रपूरच्या ‘भारतमाता’ शब्दाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
या चित्रिफितीबद्धल विचारणा केली असता त्याला पोलीस विभागाच्या जबाबदार सूत्राने ती खरी असल्याची माहिती दिली. मारहाण करणारा पोलीस संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस ठाण्याचा बिट जमादार नंदकिशोर तिवारी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा…गडकरींची चुकीची चित्रफीत प्रसारित, काँग्रेसला नोटीस
पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्याला आज शनिवारी दुपारी सेवेतून निलंबित करण्यात आले. तसे आदेश तामगाव ठाणेदारांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या पोलिसाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही तामगाव पोलीस ठाण्यात सुरू आहे. कायदेशीर कठोर कारवाई खेरीज विभाग स्तरावर देखील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.