अकोला : एरवी थंडगार एसी कॅबिनमध्ये बसून आपले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जीव आता टांगणीला लागला. त्याचे कारणही तसेच. प्रश्न चक्क २९४ कोटी रुपयांचा. त्याच्या वसुलीसाठी धावाधाव सुरू असून वरिष्ठ अधिकारी एसी कॅबिन सोडून चक्क ग्राहकांच्या दारात पोहोचले आहेत.

वापरलेल्या विजेचे पैसे वेळेवर भरण्यास ग्राहकांकडून टाळाटाळ होत असल्याने महावितरणच्या अकोला परिमंडळातील एकूण थकबाकी २९४ कोटी ४१ लाख रुपयांवर पोहोचली आहे.आर्थिक वर्षाचे शेवटचे २५ दिवस बाकी आहे. त्यामुळे वीज बिल वसुलीसाठी मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी वसुली मोहिमेत सहभागी झाले. मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना. दिलेल्या उद्दिष्टानुसार परिमंडळातील अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक,

औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडून एकूण २९४ कोटी ४१ लाख रुपयाचे थकीत वीज बिल वसूल होणे गरजेचे आहे. मागील पाच दिवसांत केवळ १७ कोटी ५१ लाख रुपये  वीज बिलाचे वसूल झाले. उर्वरित २७६ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनात परिमंडळातील विभाग, उपविभाग, शाखा कार्यालयानुसार वीज बिल वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेत महावितरणचे अधिकारी व कर्मचारी हा ग्राहकांच्या दारापर्यंत जाऊन वीज बिल भरण्याचे आग्रह धरत आहेत. वीज बिल वसुली करणाऱ्या अभियंते व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी मु़ख्य अभियंता राजेश नाईक, अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके, अजय शिंदे आणि अजितपालसिंह दिनोरे यांच्या समवेत संबंधित जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी वीज बिल वसुली मोहिमेत सहभागी होत आहेत. मोहिमे दरम्यान थकबाकीदार ग्राहक वीज बिल भरण्यास प्रतिसादच देत नसेल तर, त्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देशही मुख्य अभियंता यांनी दिले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी

अकोला परिमंडळामध्ये एकूण थकबाकीत अकोला जिल्ह्यातील १०२ कोटी ५३ लाख, बुलढाणा जिल्हा १४१ कोटी ६७ लाख आणि वाशीम जिल्ह्यातील ५० कोटी २१ ला़खाचा समावेश आहे. महावितरण वीज बिल वसुलीसाठी ग्राहकांच्या दारात पोहोचले. ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सार्वजनिक सुट्टीतही सुरू ठेवण्यात आली आहेत. याशिवाय ग्राहकांना महावितरण मोबाइल ॲप, संकेतस्थळ यासोबत ऑनलाइन वीज बिल भरण्याचीही सोय उपलब्ध आहे.

Story img Loader