नागपूर : बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठी प्रत्येक वर्षी केंद्र व राज्य सरकार कोट्यवधींचा खर्च करते. परंतु, त्यानंतरही अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या अतिदुर्गम आदिवासी भागातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यात नोव्हेंबर २०२४ मध्ये १० हजारावर बालके कुपोषित असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
जिल्हा परिषद अमरावती येथील आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२४ मध्ये धारणी तालुक्यात एकूण २० हजार ३८० बालकांपैकी (शून्य ते पाच वर्षे वयोगट) १४ हजार १२६ सर्वसाधारण वजन व उंचीची होती. ४ हजार ९६४ बालके कमी वजनाची तर १ हजार २९० बालके तीव्र कमी वजनाची अशी एकूण ६ हजार २५४ बालके कुपोषित होती.
चिखलदरा तालुक्यातील १३ हजार ९६४ बालकांपैकी ९ हजार ८६० बालके सर्वसाधारण वजन व उंचीची तर ३ हजार ३१६ बालके कमी वजनाची, ७८८ बालके तीव्र कमी वजनाची अशी एकूण ४ हजार १०४ बालके कुपोषित होती. दरम्यान, कुपोषणावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून धारणी येथील उपजिल्हा रुग्णालय,
चिखलदरातील चूर्णितील ग्रामीण रुग्णालय, ११ प्राथमिक आरोग्य केंद्र, ६ प्राथमिक आरोग्य पथके, ७ फिरत्या आरोग्य पथकांसह इतरही यंत्रणांमार्फत उपचार व उपाय केले जात असल्याचे जिल्हा परिषद अमरावतीकडून स्पष्ट करण्यात आले.
या विषयावर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाचे जन माहिती अधिकारी राजेश रोंगे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संबंधित विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही आकडेवारी दिल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही माहिती मागितली होती.
सात महिन्यात ४९ उपजत मृत्यू
मेळघाटमध्ये २०२१-२२ मध्ये ११३ उपजत मृत्यू (गर्भातच बाळाचा मृत्यू), २०२२-२३ मध्ये ७९ मृत्यू, २०२३-२४ मध्ये ७२ मृत्यू, तर एप्रिल-२०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान सात महिन्यात ४९ उपजत मृत्यू झाल्याचेही माहिती अधिकारातून पुढे आले.
या भागात २०२१-२२ मध्ये ५ मातामृत्यू, २०२२-२३ मध्ये ३ मृत्यू, २०२३-२४ मध्ये ५ मृत्यू तर एप्रिल-२०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान येथे १ मातामृत्यू झाले.