अनिल कांबळे, लोकसत्ता
नागपूर : राज्यातील बेपत्ता मुली आणि महिलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या सहा महिन्यांत राज्यातील ४ हजार ४३४ मुली-महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यात २४५८ अल्पवयीन मुलींचा समावेश असल्याची नोंद पोलीस विभागाकडे आहे.
गेल्या पाच वर्षांची आकडेवारी लक्षात घेता राज्यातील १३ ते १७ या वयोगटातील मुले-मुली हरवण्याचे किंवा घरातून पळून जाण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयातून गांभीर्याने हालचाली होत नसल्यामुळे बेपत्ता झालेल्या गुन्ह्यांच्या तक्रारीला पोलीसही गांभीर्याने घेत नाहीत. मार्च महिन्यांत राज्यातून सर्वाधिक २ हजार २०० मुली-महिला बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस विभागाकडे आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकनकर यांनी बेपत्ता मुली-महिलांची आकडेवारी जाहीर केल्यानंतर पोलीस विभागाने मुलींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यामुळे जवळपास ३० टक्के मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.
घर सोडण्याची कारणे काय?
पालकांकडून छळ, शिक्षणाची भीती, बाह्यजगाचे आकर्षण यामुळे पळून जाणाऱ्या मुलींची संख्या वाढली आहे. प्रेमात पडलेल्या अल्पवयीन मुली प्रियकरासोबत पळून जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. नोकरीचा शोध, चित्रपटात कामाची आवड, शारीरिक आकर्षण, पती-पत्नीचे विवाहबाह्य संबंध, आणि नैराश्यातूनही काहींनी घर सोडल्याचे समोर आली आहे.
बेपत्ता झालेल्या मुली-महिलांची आकडेवारी
मुंबई – ७३८
ठाणे – ५१२
पुणे – ३३४
नागपूर – १८३
नाशिक – १६२
कोल्हापूर – ११२