यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीवर विश्वास दाखवत आजपर्यंतच्या इतिहासातील बहुमत मिळवून दिले म्हणून जनतेचे आभार मानण्यासाठी शिवसेना पक्ष मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरूवारी (३ एप्रिल) यवतमाळ येथे आले होते. त्यांच्या उपस्थितीत स्थानिक पोस्टल मैदानात जाहीर सभा झाली. पोस्टल ग्राऊंडवरील गर्दीचे आजपर्यंतचे सर्व विक्रम या सभेने मोडले. २५ वर्षांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांच्या सभेला अशीच उच्चांकी गर्दी झाल्याची आठवण यवतमाळकर सांगत आहेत.
शिवेसनेचे नेते, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी तालुकास्तरावर शिवसैनिकांची आढावा बैठक घेवून पंधरा दिवसांपासून वातावरण निर्मिती केली. सभेत उसळलेला जनसागर पाहून आपल्या परिश्रमाचे चीज झाले, अशी प्रतिक्रिया ना. संजय राठोड यांनी दिली. विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच यवतमाळ येथे आले. या सभेने शिवसैनिकांमध्येही जोश निर्माण केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही, हा विश्वास देतानाच भविष्यात बहिणींच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणू, अशी ग्वाही दिल्याने उपस्थित बहिणींनीही जयघोष करत त्यांना प्रतिसाद दिला.
पोस्टल मैदानात असाच जयघोष २५ वर्षांपूर्वी महानायक अमिताभ यांचा झाला होता. येथे सन २००० मध्ये एका खासगी कार्यक्रमानिमित्त महानायक अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि अमरसिंग हे यवतमाळला आले होते. त्यावेळी पोस्टल ग्राऊंडवर त्यांची जाहीर सभा झाली. तेव्हा उच्चांकी गर्दी होती. या सभेत अमिताभ बच्चन यांनी ‘दिवार’ चित्रपटातील प्रसिद्ध संवादही आपल्या खास शैलीत म्हटला होता. गर्दीचे मोजमाप आणि सुरक्षेसाठी तैनात पोलीस यंत्रणेतील कर्मचारीही २५ वर्षांनंतर पोस्टल मैदानावर माणसांची एवढी गर्दी दिसल्याचे कार्यक्रमानंतर एकमेकांना सांगत होते. पोस्टल मैदानाचे चारही भाग, दोन्ही बाजूच्या गॅलरी आणि फूटपाथवर सर्वत्र माणसंच माणसं दिसत होती. जवळपास ५० हजारांवर नागरिक या सभेस उपस्थित होते.
शिवसेनेच्या वतीने या कार्यक्रमाचे व्यवस्थापन आणि नियोजनही चोख करण्यात आले होते. प्रचंड गर्दी होवूनही संपूर्ण कार्यक्रम सुरळीत, शांतपणे आणि विशेषत सुरक्षितपणे पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सांमत सहा वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टरने यवतमाळला आले. त्यावेळी हे हेलिकॉप्टर पोस्टल मैदानावरून घिरट्या घालत आले. हेलिकॉप्टरमधून पोस्टल मैदानात माणसांचा पूर आल्याचे दिसत होते. मुंबईच्या शिवाजी मैदानातील सभेसारखी या सभेची सुटसुटीत आखणी, मांडणी भासत असल्याची प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही शिवसेना पदाधिकाऱ्यांजवळ दिली. ही सभा उच्चांकी गर्दीची राहिली, असेही ते म्हणाले. ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेल्या छायाचित्रांमधूनही या सभेतील गर्दीचे सौंदर्य अधिक ठळकपणे दिसत आहे.