यवतमाळ : अवास्तव दावे करून विविध कंपन्या प्रोटीन पावडरची विक्री करत आहे. शरीरसौष्ठवासाठी आणि दिवसभर प्रफुल्लीत राहण्याच्या हव्यासाने अनियंत्रित पद्धतीने प्रोटीन पावडरचा वापर केल्यास तो आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो, हे संशोधनातून पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर ‘लॉ लॅब इनोवेशन’द्वारे लोकहितासाठी कार्यरत अनेक वकील आणि विधी शिक्षण घेणाऱ्या यवतमाळ, पुणे येथील विद्यार्थ्यांनी अप्रमाणित प्रोटीन पावडरच्या वापराबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
यवतमाळ येथील ॲड. असीम सरोदे यांच्या पुढाकारात सहयोग ट्रस्टच्या वतीने पुणे येथे नुकतेच ‘प्रोटीन पावडरची विक्री आणि आरोग्याचे अधिकार’ या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी फिटनेस क्षेत्रातील तज्ज्ञ अॅड. बाळकृष्ण उर्फ बंटी निढाळकर यांनी अप्रमाणित प्रोटीन पावडरचे अनावश्यक सेवन व त्यातून निर्माण होणारे जीवघेणे आजार याबाबत अनुभव कथन केले. प्रोटीन पावडर प्रमाणित नसेल तर किडनी खराब होण्यापासून हृदयविकारापर्यंत अनेक व्याधींनी ग्रस्त होऊन मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. तरीही अनेक कंपन्या अप्रमाणित, हानीकारक प्रोटीन पावडर अवास्तव दावे करून मोठ्या प्रमाणात विकत आहेत. याला तरूण मुलं, मुली, महिला, पुरूष बळी पडत आहेत. रासायनिक प्रक्रिया केलेले कोणतेही पावडर खावून कृत्रिमरीत्या दिखाऊ शरीरयष्टी तयार करण्याचा नाद चुकीचा आहे, असेही निढाळकर म्हणाले.
हेही वाचा : सावधान ! राज्यात चिकनगुनियाची रुग्णसंख्या तिप्पट; डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ५७ टक्के वाढ
सार्वजनिक-सामाजिक स्वास्थ्याचा मुद्दा म्हणून प्रोटीन पावडरची अंनियंत्रित विक्री ही चिंतेची बाब आहे. अनेक कंपन्या अन्न व औषध विभागाचे नियम धुडकावून प्रोटीन पावडर बाजारात विकत आहेत. या कंपन्यांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे आढळते. या कंपन्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या विभागाकडून कायद्याची अंबलबजावणी होत नसल्याचे अनेक प्रकरणांत आढळले. या सर्व बाबी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. प्रोटीन पावडर निर्मात्या कंपन्यांवर नियंत्रण न आणल्यास तरूण पिढी व्याधीग्रस्त होण्याची भीती या परिसंवादात अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे प्रोटीन पावडरचा वापर, विक्री, नियंत्रण आदी विषयांवर लवकरच जनहित याचिका करण्यात येईल, अशी माहिती अॅड. असीम सरोदे आणि अॅड. संदीप लोखंडे यांनी दिली. बेकायदेशीर प्रोटीन पावडरची निर्मिती आणि विक्री याचे खूप मोठे रॅकेट महाराष्ट्रात कार्यरत असल्याबाबत अनेकदा बोलले गेले. अशा बेकायदेशीर प्रोटीन पावडरचा करोडो रुपयांचा व्यापार राज्यात सुरु आहे, अशी माहिती इंटरनेट रिसर्चमधून पुढे आल्याचे अॅड. श्रीया आवले यांनी सांगितले.
हेही वाचा : वर्धा : जे आजपर्यंत घडले नाही, ते आता घडणार; विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपचा प्रथमच…
प्रोटीन पावडरचा वापर, आरोग्य आणि कायदा या संदर्भात झालेल्या या परिसंवादात अॅड. रमेश तारू, अॅड. श्रीया आवले, अॅड. किशोर वरक, अॅड. शिल्पा शिंदे, रिशान सरोदे, कुलसुम मुल्लाणी, संध्या सोनवणे, आकांक्षा सुपलेकर, यशराज देशमुख, मुस्कान सतपाल, मोहम्मद उबेद, शुभम नागरे, रिषभ शर्मा, जोम मॅथीव्ज, ओम भुरंगे, सहभागी झाले होते. वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या यवतमाळ, पुण्यातील या विद्यार्थ्यांनी प्रोटीन पावडर सेवनामुळे ज्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या त्यांनी सहयोग ट्रस्टशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.