नागपूर : पंजाबमधील ३० ट्रकचा मालक असलेल्या वाहतूकदाराला करोनात खूप नुकसान झाले. त्यामुळे त्याला सर्व ट्रक विकावे लागले. करोनात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्याने काही साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकून चोरीचे ट्रक विक्री करण्याची योजना आखली. मात्र, ही टोळी नागपूर ग्रामीण पोलिसांच्या हाती सापडल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली. यावेळी अपर अधीक्षक संदीप पखाले आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे उपस्थित होते.
टोळीचा म्होरक्या आरोपी समरजीत सिंह सरदार संतासिंह (मुक्तसर, पंजाब) हा एकेकाळी ३० ट्रकचा मालक होता. करोनात त्याचा व्यवसाय बुडाला आणि त्याला सर्व ट्रक विकावे लागले. त्यामुळे समरजीतने ट्रक चोरी करून पैसे कमविण्याचा कट रचला. या कटात त्याच्याकडे कामाला असलेले ट्रकचालक नूर मोहम्मद (प्रतापगढ, उत्तरप्रदेश), अब्दूल रहमान (धारावी, मुंबई), मोहम्मद तसरीबउद्दीन (राणीगंज, उत्तरप्रदेश) यांना सहभागी करुन घेतले. साहिल कुरेशी आणि ईबरार गब्बी हे दोन आरोपींही त्यांच्या टोळीत सहभागी झाले. त्यांनी १७ फेब्रुवारीला मौदा हद्दीत ट्रकचालक किशोर मंडळ आणि क्लिनरचे हात-पाय बांधून ट्रक चोरून नेला.
हेही वाचा >>> नागपूर : गृहनिर्माण प्रकल्पाची कागदपत्रे आता संकेतस्थळावर, नागरिकांची फसवणूक टाळणार
दोघांनाही एका कारमध्ये कोंबून गोंडगाव खदानीत फेकून दिले. त्यानंतर, समरजीतच्या टोळीने १९ फेब्रुवारीला रामटेकमधील खिंडसी पुलाजवळ ट्रकचालक सतीश इंगोले आणि त्याच्या क्लिनरला कारमध्ये कोंबून जंगलात फेकले. त्यांचा ट्रक लंपास केला. याप्रकरणी गुन्हे शाखेचे ओमप्रकाश कोकाटे, राजीव कर्मलवार, अनिल राऊत, आशीष ठाकूर यांच्या पथकाने तब्बल तीन दिवस २०० सीसीटीव्हीचे १०० तासांचे फुटेज बघितले. त्यातून एका कारवर संशय आल्यानंतर तपासाचा धागा मिळाला. टोळीतील ४ आरोपींना अटक करण्यात आली तर दोन आरोपींचा शोध सुरु आहे. दोन्ही आरोपी लग्नानिमित्त गावी गेले आहेत. या टोळीला जवळपास ५० ट्रक चोरण्याचे ‘टार्गेट’ होते. त्यांनी चोरीचे ट्रक विकण्यासाठी कोलकातातील एका भंगार व्यापाऱ्यांशी सौदाही केला होता. चोरीची वाहने वापरून ट्रक चोरी करण्यावर टोळीचा भर होता. मात्र, ग्रामीण पोलिसांनी त्यांचा छडा लावला.