वर्धा: आयआयटी दिल्ली येथे ४२ वर्ष अध्यापन व त्यानंतर दोन वर्ष मानद प्राध्यापक म्हणून कार्य केलेले पद्मश्री डॉ.किरण सेठ क्रांतीदिनी वर्धेत पोहचले. गतवर्षी १५ ऑगस्टला त्यांनी काश्मीर पासून सायकलवर देश भ्रमण करण्यास सुरवात केली.
सप्टेंबरला ते कन्याकुमारीस पोहचले होते .आता परतीच्या प्रवासात असताना वर्ध्यात थांबले. एरव्ही रोज ५० किलोमीटरचा प्रवास करीत. पण क्रांतीदिनी गांधी भूमीत जायचेच, असा निर्धार असल्याने त्यांनी एकाच दिवसात ६५ किलोमीटरचा प्रवास केला. येथील मगन संग्रहालयाच्या वृक्षराजीत ते विसावले. ही सायकल यात्रा तीन उद्देश ठेवून झाली. एकट्याने सायकल चालविण्याचे फायदे, शास्त्रीय संगीत प्रसार व गांधी विचारांचा जागर करणे. ते म्हणतात की एकट्याने सायकल चालविणे म्हणजे स्वतःचा स्वतःशी संवाद होय. जणू ध्यान साधनाच. शास्त्रीय संगीत म्हणजे मनोरंजन नव्हे. ती एक अनुभूती होय.
हेही वाचा… पावसाळ्यात “या” रानभाज्या खायलाच हव्यात; आरोग्यासाठी आहेत लाभदायक
मनोरंजनात वाहवा मिळेल. पण उत्स्फूर्त आह निघणार नाही. मुलांना रोज किमान अर्धा तरी आईने शास्त्रीय संगीत ऐकविले पाहिजे. गांधी कधीच अप्रासंगिक ठरत नाही.त्यांचे विचार कालातीत आहेत. डॉ.सेठ यांनी स्पिक मॅके या संस्थेच्या माध्यमातून देशभर शास्त्रीय संगीताचा प्रसार सुरू ठेवला आहे.नव्या पिढीस हे संगीत समजणे आवश्यक असल्याचे ते म्हणतात. त्याचे देशात शंभर तर विदेशात दरवर्षी पन्नास कार्यक्रम होतात. किडकिडीत शरीरयष्टी लाभलेले हे अत्यंत कृजू ७५ वर्ष वयाचे व्यक्तिमत्व रोज ५० किलोमिटर सायकलिंग करीत असेल असे वाटत नाही.
मितभाषी मात्र मतांवर ठाम राहून ते कार्यारत आहेत. आपले अनुभव विश्व आणखी समृध्द करीत. लोकसत्ता ऑनलाईन सोबत त्यांनी मुकेश लुतडे, डॉ.प्रियराज महेशकर यांच्यासह डॉ.विभा गुप्ता यांच्या निवासस्थानी संवाद साधला.