सॅनेटरी नॅपकिन्स तयार करण्याचे यंत्र तयार करणाऱ्या मुरूगनथम यांचे नाव सर्वपरिचित आहे. त्यांच्या जीवनावर आधारित अक्षयकुमार यांचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. मुरूगनथम यांच्याच पावलावर पाऊल ठेवत विदर्भातील दोन भावंडांनी हे यंत्र तयार केले आहे. चेतन आणि अक्षय जैन असे त्यांचे नाव.
चेतन आणि आकाश हे दोघे अमरावती जिल्ह्य़ातील शेंदूरजनाघाट या गावातून रोजगाराच्या शोधात नागपुरात आले. विशेष तांत्रिक ज्ञान नाही, पण नवीन धडपड करण्याची उमेद त्यांच्यात ठासून भरली आहे. लहानपणापासूनच चेतनला यंत्रासोबत खेळण्याची आवड. शालेय विज्ञान प्रदर्शनात दुचाकीपासून मोटारकार तयार करण्याचा त्याचा प्रयोग पारितोषिकासाठी निवडला गेला. तेव्हापासून त्याची प्रयोगशील वृत्ती कायम आहे. नागपुरात आल्यावरही नातेवाईकांच्या घरी स्क्रीन प्रिन्टींगच्या व्यवसायात रुळताना त्याने या यंत्रात काही बदल करून ते स्वयंचलित पद्धतीत रूपांतरित केले. यंत्राशी खेळण्याचा व त्यातून काही नवीन तयार करण्याच्या प्रयत्नाने त्याचे नाव यांत्रिकी क्षेत्रात सर्वदूर झाले. हीच ओळख त्याला ‘सॅनेटरी नॅपकिन्स’ तयार करणारे यंत्र निर्मितीसाठी कामी आली.
चंद्रपूर येथील रामटेके यांनी मुरूगनथम यांच्याकडून व्यवसायासाठी ‘सॅनेटरी नॅपकिन्स’ तयार करणारे यंत्र खरेदी केले होते. त्यांनी चेतनशी संपर्क साधला. तेथून चेतनने या यंत्राचा अभ्यास करण्याचे काम सुरू झाले. यानिमित्त तो मुरूगनथम यांच्याशीही दूरध्वनीवरून बोलला. अनेक दिवसाच्या संशोधनानंतर एक नवे यंत्र तयार झाले. त्याची अधिक ‘पॅड’ तयार करण्याची क्षमता होती. अशाप्रकारचे मशीन तयार करणारा तो या भागातील एकमेव होता. महिला बचत गटाकडून त्याला मागणी येऊ लागली. खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या धापेवाडा या गावात त्याच युनिट लावले. ते अजूनही तेथे सुरू आहे. राज्याच्या विविध भागातून त्याच्या या यंत्राची मागणी येऊ लागली आहे.त्याने यात अनेक बदल केले. स्वयंचलित यंत्र तयार केले. ‘मॅटर्निटी’ आणि ‘अॅडल्ट पॅड’ निर्मितीसोबतच त्याने ते नष्ट करणारेही यंत्र तयार केले.
कोराडी येथे त्याचं छोटसं वर्कशॉप आहे. तेथे त्याचे यंत्रनिर्मितीचे प्रयोग सुरू असते. सोबतीला भाऊ आकाश आहे. तो सुद्धा चेतनसारखाच यंत्रवेडा. नवनवीन कल्पना मनात आणायच्या आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपड करायची असा या दोन भावंडांचा उद्योग आहे. त्यांच्याकडे करण्यासारख्या अनेक योजना आहेत, पण निधीची चणचण आहे. ‘स्टार्टअप’, ‘मेक इन इंडिया’चा गाजावाजा असणाऱ्या काळातही सरकार त्यांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही, बँका वेगवेगळे कारण देऊन त्यांना कर्जपुरवठा करीत नाही. मात्र, त्यांची जिद्द संपली नाही.