स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरे करत असताना आजही केंद्र व राज्य सरकार सातत्याने भटक्या विमुक्तांवर अन्याय करत आहे. यापुढे या अन्यायाच्या विरोधात संघर्षाची भूमिका घेणार आहे. उद्या होणाऱ्या अधिवेशनात त्या संदर्भात भूमिका निश्चित केली जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा- नागपूर : शहरातील विविध स्मारक व नामफलक दुर्लक्षित; केवळ जयंती, पुण्यातिथीला स्वच्छता मोहीम
लक्ष्मण माने म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जमातीसाठी मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. मात्र, विदर्भात पोहचलो नव्हतो. विदर्भात मोठ्या प्रमाणात भटके विमुक्त जमातीचे लोक असून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात संघर्ष करणार आहे.
राज्यात गेल्या काही दिवसात ज्या काही भटक्या विमुक्तांच्या संदर्भात घटना घडल्या त्याचा आम्ही निषेध केला आहे. भटक्या जमातीचा आज कोणी वाली नाही. त्यामुळे तो दुर्लक्षित आहे. त्यांना आता संघटित करण्याचे काम केले जाणार आहे. भटक्या विमुक्त जमातीचा अनुसूचीमध्ये समावेश करण्यात यावा यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारला अहवाल दिला. मात्र, सरकारने अजूनही त्याबाबत ठराव केला नाही. आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यात ठराव करण्यात आला मात्र महाराष्ट्रात सातत्याने अन्याय केला जात असल्याचे माने म्हणाले.
माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांना राज्यकर्ते आणि जनता विसरली आहे. त्यांची जयंतीसुद्धा सरकारकडून साजरी केली जात नाही. विधिमंडळात त्यांचे छायाचित्र लावण्यात आले नाही. ते बलदार या भटक्या जमातीमध्ये होते म्हणून त्यांची सरकारमध्ये उपेक्षा तर केली जात नाही ना, असा प्रश्न माने यांनी उपस्थित केला. त्यांच्या नावाने विद्यापीठाची आणि पोहरादेवी येथे सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.