अमरावती : काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी यावेळी पर्यटकांना लक्ष्य केले आहे. पहलगाम मधील ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. यावेळी पहलगामच्या परिसरात अमरावतीचे सुमारे ३६ पर्यटक वेगवेगळ्या गटांमध्ये होते. हे सर्व पर्यटक सुखरूप आहेत.
अमरावतीतील मंगला बोडके, छाया देशमुख, चंदा लांडे, सारिका चौधी आणि निता उमेकर यांच्या कुटुंबातील सदस्य जम्मू काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. मंगळवारी ते पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले. तेथे ते हसत खेळत पहलगामच्या वातावरणात हरवले होते. त्यांनी तेथे व्हिडिओ, फोटो काढले. या कुटुंबियांमध्ये सर्वच वयोगटातील लोकांचा समावेश होता. काही वेळानंतर ते तिथून निघाले आणि काही क्षणातच तेथे दहशतवादी हल्ला झाला. तोपर्यंत ते सुखरुप स्थळी पोहचले होते. सध्या ते श्रीनगरमध्ये अडकलेले आहेत.
महाराष्ट्र शासनाने या पर्यटकांना मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. काही पर्यटक श्रीनगर आणि पहलगाम येथील हॉटेलमध्ये थांबून आहेत. हे पर्यटक कालच्या घटनेने हादरून गेले आहेत. अनेक पर्यटकांनी आपल्याला रात्रभर झोप देखील लागली नाही, असे सांगितले.
आंचलविहार, इश्वर कॉलनी परिसरातील २२ पर्यटक देखील काश्मिरला गेले होते. ते सर्व सुखरूप असून श्रीनगरहून दिल्ली येथे विमानाने रवाना झाले आहे. जिल्ह्यातील करजगाव येथूनही काही पर्यटक पहलगाम येथे गेले होते, तेही सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. हे पर्यटक आता घरी परतण्याच्या प्रयत्नात आहेत.
अमरावती येथील पर्यटक चंदा लांडे यांनी पहलगाम येथील घटनेविषयी माहिती दिली आणि सुरक्षा पुरवण्याची मागणी केली. pic.twitter.com/76GaYaYR5T
— LoksattaLive (@LoksattaLive) April 23, 2025
विविध ट्रॅव्हल कंपन्यांद्वारे काश्मीरमध्ये गेलेले सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहेत. आम्ही स्थानिक सहल संयोजकांच्या संपर्कात आहोत. पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते आहे, अशी माहिती विविध ट्रॅव्हल कंपनी संचालकांनी दिली आहे.
सहलींचा हंगाम असल्याने जिल्ह्यातून सुमारे ४० पर्यटक सध्या जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनास गेले आहेत. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याची माहिती जाहीर झाल्यानंतर सर्वच पर्यटन कंपन्यांना धक्का बसला.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती, दूरध्वनी क्रमांक: ०७२१-२६६२०२५, आपत्कालीन संपर्कासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर संपर्क क्रमांक : ९४२१७४७७७७, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, संपर्क क्रमांक : ९५४५४६३४५० यावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.