अकोला : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करीत मोठा हल्ला केला. ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममधील बैसरन भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार केले. यावेळी अकोल्यातील सुमारे ३० पर्यटक काश्मीरमध्ये होते. पहलगामला पोहोचण्यापूर्वीच हल्लाची त्यांना माहिती मिळाली. त्यामुळे त्यांना जाण्यापासून रोखण्यात आले. आता श्रीनगरमध्ये त्यांना ‘हाऊस बोट’चा आधार मिळाला. श्रीनगरमध्ये सुरक्षित वातावरण असले तरी भीती, चिंता असल्याचे पर्यटकांनी सांगितले. विमानसेवा उपलब्ध झाल्यास थेट अकोला गाठण्याचा मानस पर्यटकांनी व्यक्त केला.   

गुरु माऊली टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचे अंबादास सप्रे व पंकज साहू यांच्यासोबत अकोल्यातील ३० पर्यटक जम्मू काश्मीरला पर्यटनासाठी गेले आहेत. मंगळवारी ते पहलगाम येथे जाणार तर त्याठिकाणी दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्याची माहिती अकोल्यातील पर्यटकांना मिळाली. पहलगाम येथे जाण्यापासून त्यांना वेळीच सुरक्षा यंत्रणेकडून रोखण्यात आले. त्यामुळे हे सर्व पर्यटक सोनमर्ग येथून श्रीनगर येथे दाखल झाले आहेत. हे पर्यटक कालच्या घटनेने हादरून गेले आहेत. अनेक पर्यटकांची झोप देखील उडाली. ते आता घरी परतण्याच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान, अकोल्यातील पर्यटकांनी सध्या श्रीनगरमध्ये ‘हाऊस बोट’चा आधार घेतला. अकोल्यातील पर्यटन व्यावसायिक माधव देशमुख यांचे श्रीनगरमध्ये कार्यालय असून त्यांचे तेथील सहकारी फारुख अकोल्यातील पर्यटकांनी सहकार्य करीत आहे. पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी तयार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.  

पर्यटकांवर हल्ला खेदजनक; गैरसोय होऊ देणार नाही

काश्मीरमध्ये पर्यटकांवर हल्ला होणे अत्यंत खेदजनक आहे. प्रत्येक काश्मिरी नागरिक घटनेचा तीव्र निषेध करीत आहेत. पर्यटक म्हणून आलेल्या पाहुण्याची गैरसोय होऊ दिली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया श्रीनगर येथील पर्यटक व्यावसायिक फारुख यांनी व्यक्त केली.

मदतीसाठी संपूर्णवेळ मदत कक्ष 

काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला असून जिल्ह्यातील पर्यटक त्या ठिकाणी अडकले असल्यास मदतीसाठी जिल्हास्तरावर पूर्णवेळ संपर्क कक्ष स्थापित करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन काश्मीर प्रशासन तसेच राज्य नियंत्रण कक्षाशी सातत्याने संपर्क ठेवून आहे. या घटनेत अकोला जिल्ह्यातील कुणी पर्यटक असल्याची माहिती अद्यापपर्यंत प्रशासनाला प्राप्त नाही. सातत्याने संपर्क सुरू आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक ०७२४- २४२४४४४ आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर  अकोला जिल्ह्यातील नागरिकाची काहीही माहिती असल्यास तत्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.