Pahalgam Terror Attack Updates: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीनगर येथे ‘हाऊस बोटी’च्या सहाय्याने भीती, चिंतेच्या वातावरणात दिवस काढणाऱ्या अकोल्यातील पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला.

राज्य सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी केली. शुक्रवारी २३२ प्रवाशांना घेऊन एक विशेष विमान मुंबईत दाखल होणार आहे. त्यामध्ये अकोल्यातील ३० पर्यटकांचा समावेश आहे.

गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून अकोल्यातील ३० जण जम्मू काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. मंगळवारी ते पहलगाम येथे जाणार होते. मात्र, पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. त्याची माहिती अकोल्यातील पर्यटकांना मिळाली. त्यामुळे हे सर्व पर्यटक सोनमर्ग येथून श्रीनगर येथे दाखल झाले. दोन दिवसांपासून ते श्रीनगर येथे ‘हाऊस बोट’ मध्ये वास्तव्य करीत होते.

काश्मीरातील महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत राज्य सरकारने विमानाची व्यवस्था केली आज काश्मीरमधून येणार्‍या विशेष विमानात अकोला, अमरावती येथील पर्यटक राहणार आहेत. त्यामध्ये अकोल्यातील अडकलेल्या त्या ३० पर्यटकांचा देखील समावेश आहे.

दिल्लीत महाराष्ट्र सदनात प्रवाशांच्या याद्या सातत्याने तयार केल्या जात असून, गरज पडल्यास आणखी विशेष विमान पाठवण्याची तयारी राज्य सरकारने केली.