नागपूर : नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील अनेक बाबी समोर येत आहेत. याप्रकरणी मुन्ना तुलाराम वाघमारे (वय ३८, रा. पालांदूर, भंडारा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मुन्ना वाघमारे हे शाळेत पेंटर म्हणून काम करतात. यावेळी बनावट कागदपत्रे देऊन आरोपी मुख्याध्यापक पराग नानाजी पुडके यांच्या मुख्याध्यापक बनवण्यात आल्याची कुजबुज त्यांना लागली. त्यानंतर त्यांनी ही तक्रार केली असून कारवाई झाली आहे. विशेष म्हणजे पुडके यांचे कागदपत्रे तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी त्याला छाणनी समितीकडे पाठवली होती.
समितीने कागदपत्रे बनावट असल्याचा आशयाचे पत्र दिल्यावरही त्याच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. १०० कोटींचा हा घोटाळा असून एका शिक्षकाकडून नियुक्तीसाठी १० ते १५ लाख रुपये घेण्यात आल्याचे माहिती आहे. विशेष म्हणजे बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्त झालेल्या शिक्षकांचे आता काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात संपूर्णतः शिक्षकांची पदभरती बंद करण्यात आली. त्यानंतरही नागपूर विभागातील काही शाळांमध्ये ५८० शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. आदेश नसताना या नियुक्त्या कशा झाल्या अशी चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, चौकशीमध्ये ५८० पैकी २४४ शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नस्ती तपासण्यात आल्या, उर्वरित शिक्षकांना कसे नियमित करण्यात आले? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
राज्यात सर्वत्र २०१२ पासून शिक्षकांच्या नियुक्त्या बंद करण्याचे आदेश होते. मात्र, त्यानंतरही बऱ्याच शाळांकडून शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात. यामध्ये शहरातील काही नामांकित शाळांचा समावेश होता. त्या शाळेतील शिक्षकांना नियमित करण्यासाठी अधिकारी आणि शाळा संचालकांच्या संगनमताने प्रयत्न करण्यात आले. यामध्ये ५८० शिक्षकांचा समावेश होता. या नियुक्त्यांबाबत खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आक्षेप नोंदविण्यात आला होता. त्यातून उपसंचालकांना निवेदनही देण्यात आले होते.
मात्र, याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत, त्या नियुक्त्या नियमित करण्यावर अधिकाऱ्यांनी भर दिला, त्यातूनच तत्कालिन उपसंचालकांच्या मदतीने यातील निम्म्या नियुक्ती नियमित झाल्याचे दिसून येते. त्यामुळेच चौकशीतही ५८० पैकी २४४ शिक्षकांच्या नस्तीबाबत चौकशी करण्यात आली.
या चौकशीत ३१ जणांच्या नस्ती आढळून आल्यात. मात्र, नियुक्तीच बंद असताना, त्या नियुक्त्या नियमित केल्याच कशा? हा मोठा प्रश्न आहे. याचाच फायदा वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे यांनी घेत, त्या शिक्षकांच्या वेतनाबाबत चुकीच्या सूचना निर्गमित करीत, उर्वरित सर्व शिक्षकांचे बनावट आयडी तयार करीत त्यातून शिक्षकांचे पगार दिलेत. त्यामुळे नीलेश वाघमारे हे या प्रकरणातील एक धागा असून त्या धाग्यामागे अनेक सूत्रधार लपून असल्याचे दिसते.