नागपूरसह देशभरातील कलावंतांनी तयार केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित पेन्टिंग्जचे प्रदर्शन नागपूरमध्ये भरवण्यात आले असून त्यात मोदी यांच्या राजकीय प्रवासासोबतच त्यांची तुलना विष्णूशी करणाऱ्या पेन्टिंगजचाही समावेश आहे. सध्या हे प्रदर्शन राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरू लागले आहे.
हेही वाचा >>> गडचिरोलीतील स्थिती भयावह ! विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप, सूरजागड लोहप्रकल्पातील दाव्याचीही पोलखोल
सुरेंद्र आर्ट गॅलरी ,भूवनेश्वर यांच्यावतीने आयोजित या पेन्टिंग्ज प्रदर्शनाचे नाव ‘मोदी@२०’ असे आहे.त्याचे उद्घाटन सोमवारी भाजप नेते व माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते झाले. पेन्टिंग्जमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा मोदी यांचा राजकीय प्रवास साकारण्यात आला आहे. त्याच बरोबर त्यांचे विचार, त्यांचा दृष्टिकोण, त्यांनी घेतलेले निर्णय आदींवर आधारित पेन्टिगंजचा समावेश आहे. यासोबतच काहीपेन्टिंग्जमध्ये मोदींना देवाच्या रूप दर्शविण्यात आलं आहे. एका पेंटिंगमध्ये तर चक्क मोदींना विष्णुजींचा अवतार तर दुसऱ्या एका पेंटिंगमध्ये भगवान राम दाखविण्यात आले आहे. यामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकारणात महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून आणि देवांबद्दल केल्या गेलेल्या वक्तव्यांवरून वाद झालेले बघायला मिळाले. यामध्ये सर्वाधिक आरोप करण्यात आले ते महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि नुकताच त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला. त्यावर अजूनही प्रतिक्रिया येतच आहेत. अशातच नागपुरात मोदींना देवांच्या रुपात दाखवल्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.