बुलढाणा : “साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा.” राजमाता जिजाऊंच्या पावन वास्तव्याने पुनीत ऐतिहासिक सिंदखेडराजा सह पंचक्रोशीतील हजारो भाविकांची आज अशीच भावावस्था आहे. आज त्यांची मने अधीर आहेत, त्यांचे डोळे ‘त्या’ दिशेला आणि वाटेकडे लागले आहेत. त्यांच्यासाठी दसरा आणि दिवाळी आजच आहे…
याचे कारण शेगाविचा राणा संत गजानन महाराज यांची पालखी आज शनिवारी ,३ ऑगस्टला संध्याकाळी विदर्भात डेरेदाखल होणार आहे. मराठवाडा मधून थाटात येणारी शेकडो वारकऱ्यांची ही पालखी मातृतीर्थ सिंदखेडराजा मध्ये दाखल होत आहे.पालखीचा पहिला मुक्काम सिंदखेडराजा मधील जिजामाता विद्यालयात राहणार आहे. यामुळे आज शनिवारी सकाळ पासूनच जिजाऊंच्या माहेरात पालखीसह येणाऱ्या वारकरी आणि चोहोबाजूनी येणाऱ्या हजारो आबालवृद्ध भाविक भक्ताच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे. पालखीच्या रात्रीच्या मुक्कामाची, महाप्रसाद वितरण ची तयारी करणाऱ्या यजमान आयोजकांची लगबग, धावपळ दिसून येत आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंनी संयम बाळगावा…” खा. प्रफुल पटेल यांचा सल्ला; म्हणाले, “ते वक्तव्य…’’
सावरगाव येथे आगमन
पृथ्वीतलावरील श्रीक्षेत्र पंढरपूर येथून मागील २१ जुलैला परतीच्या प्रवास सुरू करणाऱ्या शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्या पालखी दिंडीचे ३ ऑगस्ट रोजी विदर्भात आगमन होत आहे. याप्रसंगी मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर बुलढाणा जिल्ह्यातील माळ सावरगाव ( तालुका सिंदखेडराजा) याठिकाणी संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन सोहळा रंगणार आहे. यानिमित्त भाविक भक्तांची जय्यत तयारी सुरू केली आहे.
श्री गजानन महाराजांच्या पालखीचे मराठवाड्यातून विदर्भात आगमन झाल्यानंतर माळ सावरगाव सीमेवर आध्यात्मिक क्षेत्रातील वारकरी संप्रदायाच्या वतीने भव्य सोहळा होतो. वारकरी एकमेकांना आलिंगन देतात, पेढा भरवतात, भजन म्हणून नाचून गाऊन आपला आनंद व्यक्त करतात. हरी नामाचा जयजयकार येथे केला जातो. अत्यंत भक्तीमय वातावरण येथे निर्माण होते. माळ सावरगाव ते सिंदखेड राजा पर्यंत ठिकठिकाणी भाविक भक्त चहा, पोहे, नाश्ता, फराळ वाटपाची अनेकांनी तयारी केली आहे. पालखी मार्गावर दुतर्फा गजानन महाराजांच्या पालखी स्वागताचे बॅनर ठिकठिकाणी झळकतांना दिसून येत आहे.
हेही वाचा…चंद्रपूर : ४० जिवंत काडतुसे, तलवार व वाघनखं… युवा सेना जिल्हाप्रमुखाच्या घरून शस्त्रसाठा जप्त
सिंदखेडराजा येथे श्री गजानन महाराजांच्या पालखीचे झाल्यानंतर मोती तलाव मार्गे जिजामाता नगर पुढे रामेश्वर मंदिर येथे जेवण, त्यानंतर महात्मा फुले शाळा मार्गाने जिजामाता शाळेमध्ये भाविक भक्तांना दर्शनासाठी रांगेने उभे राहून दर्शन सोहळा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर इथेच पालखी मुक्कामी राहणार आहे. रात्री धार्मिक कार्यक्रम, भोजन पार पडल्यावर वारकरी विसावा घेणार आहे.
हेही वाचा…गडचिरोली : फेरफारसाठी शेतकऱ्याकडे पैश्यांची मागणी; लाचखोर मंडळाधिकारी, तलाठी अटकेत
सिंदखेड राजावरून उध्या ४ ऑगस्ट रोजी सकाळी पालखी बुलढाणा जिल्ह्यातील पुढील प्रवासाला रवाना होणार आहे. सिंदखेडराजा येथून निघालेली पालखी लोणार, मेहकर, खामगाव तालुक्यातील गावातून शेगावी दाखल होणार आहे. शेगाव येथे ११ ऑगस्ट रोजी पालखी पोहोचणार आहे.