चंद्रपूर : रंगपंचमी जवळ आली की हमखास आठवण होते ती पळस फुलांची, भर उन्हात सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना लाल- केशरी रंगाची भरगच्च फुले लागलेली पळसाची झाडे आपणास दिसतात. मात्र, चंद्रपुरातील चिचपल्लीच्या जंगलात चक्क दुर्मिळ व औषधीयुक्त गुण असलेला पिवळा पळस आढळून आला आहे. पिवळ्या पळसाला विशेष महत्त्व असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
वसंत ऋतू आला की, झाडाची पाने गळून पडतात आणि संपूर्ण झाड लाल- शेंदरी रंगाच्या फुलांनी बहरून जाते. लाल- शेंद्री रंगाचे पळस सर्वत्र पाहायला मिळते. झुपकेदार फुलांसाठी प्रसिद्ध हे पळस सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्लीच्या जंगल परिसरात तलावाजवळ हा दुर्मीळ असा पिवळा पळस आढळून आला आहे. पिवळा पळस हा अत्यंत दुर्मीळ समजला जातो. औषधीसाठी या फुलांचा उपयोग केला जातो. पिवळ्या पळसाबद्दल एक अंधश्रद्धा अशी देखील आहे की, त्याच्या पिवळ्या फुलांचा उपयोग गुप्तधन शोधण्यासाठी केला जातो. ही जरी अंधश्रद्धा असली तरी या झाडाचे आकर्षण सगळ्यांनाच आहे. या पिवळा पळसाचे झाड छायाचित्रकार देवानंद साखरकर यांनी पहिल्यांदाच पाहिले आहे. पिवळा पळस असल्याची माहिती होताच अनेकांनी हा पळस पाहण्यासाठी चिचपल्लीच्या जंगल परिसरात गर्दी केली आहे.
हेही वाचा – भंडारा : गंभीर अनियमिततांचा ठपका, शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्यांना घरचा रस्ता
हेही वाचा – अखेर ठगबाज मीरा फडणीस नागपूर पोलिसांच्या ताब्यात, राजकीय वरदहस्तामुळे आतापर्यंत…
तज्ज्ञ म्हणतात हा सगळा अल्बिनिझमचा प्रकार
पिवळ्या पळसाबद्दल तज्ज्ञ सांगतात की, हा सगळा अल्बिनिझमचा प्रकार आहे. यामध्ये वनस्पतीतील रंगद्रव्यात बदल होतो. एरवी लाल, केशरी- भगव्या रंगाचे आढळणारे पळस पिवळ्या रंगाचे आढळणे हा अल्बिनिझमचाच प्रकार आहे. अतिशय दुर्मीळ व औषधीसाठी अनन्यसाधारण महत्व असणाऱ्या या पिवळ्या पळसाचे संवर्धन व संरक्षण होणे आवश्यक आहे.