अकोला : ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमाचा प्रारंभ क्रांती दिनी ९ ऑगस्टला होत आहे. यादिवशी सर्व कार्यालयांत ‘पंचप्राण शपथ’ कार्यक्रम सकाळी १० वाजता होणार आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी देखील सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशाचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे . या महोत्सवात विविध उपक्रम घेण्यात येत आहे. या अंतर्गत ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमाला ९ ऑगस्टला सुरुवात होईल.
यामध्ये भारताला २०४७ पर्यंत विकसित बनविण्याचे स्वप्न साकार करण्याची, गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकण्याची, देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान सदैव बाळगण्याची, एकता व एकजूट यासाठी कर्तव्यदक्ष राहण्याची, नागरिकाचे कर्तव्य बजावण्याची व देशाचे रक्षण करणाऱ्यांचा कायम आदर राखण्याची शपथ देशबांधव घेणार आहेत.
सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपक्रमात सहभागी व्हावे, तसेच ठिकठिकाणी नागरिकांनीही ‘पंचप्राण शपथ’ घेऊन उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.