अमरावती : गावाच्या प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी पांढरी खानमपूर येथील आंबेडकरवादी नागरिकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गेल्या गुरुवारपासून सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाला सोमवारी सायंकाळी हिंसक वळण लागले. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीमार करून आंदोलनकर्त्यांना पांगविले. यावेळी अश्रूधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या.
ठिय्या आंदोलन सुरू असताना दुपारी अचानकपणे काही आंदोलनकर्त्यांनी पोलिसांनी उभारलेले कठडे तोडून विभागीय आयुक्त कार्यालयात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. काही जण आत शिरण्यात यशस्वी ठरले. या दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगविण्याचे प्रयत्न सुरू केले. आंदोलनकर्त्यांच्या दिशेने पोलिसांनी पाण्याचे फवारे मारले. पण, त्यानंतर काही जणांनी दगडफेक सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार करून आंदोलनकर्त्यांना पांगवले.
हेही वाचा – आमदार निलेश लंके यांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “शरद पवार गटात प्रवेश…”
दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पांढरी खानमपूर गावाच्या प्रवेशद्वारावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक देखील घेतली होती. या बैठकीत काही तोडगा देखील निघल्याचे सांगितले गेले होते. परंतु गावातील काही आंदोलक त्यांच्या मागणीवर ठाम असल्याने ते तीन दिवसांपासून विभागीय आयुक्तालयासमोर ठाण मांडून बसलेले होते. परंतु आज आंदोलक आक्रमक झाले.
हेही वाचा – जिंकण्याची क्षमता असेल तरच जागा मागा, शहा यांनी शिंदे-पवारांना बजावले !
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील प्रवेशद्वारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी गावातील आंबेडकरवादी मागील गुरुवारपासून अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी देखील त्यांनी रस्त्यावर ठाण मांडले. पांढरी खानमपूर येथील ग्रा.पं. ने गावातील मुख्य प्रवेश मार्गावर प्रवेशद्वार उभारण्याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर गावातील काही नागरिक त्यास विरोध करत आहेत. प्रवेशद्वारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात येत नसल्याने काही महिन्यांपासून गावात तणावाचे वातावरण आहे.
हेही वाचा – राज्यात पुन्हा १० हजार शिक्षकांची भरती, कोणत्या महिन्यात होणार टीईटी? जाणून घ्या…
विभागीय आयुक्तांचा निर्णय न दिल्यास आम्ही मुंबईच्या दिशेने ‘लॉंग मार्च’ काढू व मुख्यमंत्र्यांनाच न्याय मागू, असे पांढरी खानमपूर येथील एका गटाचे म्हणणे होते. २६ जानेवारी २०२० व २०२४ चा ग्रामसभेचा ठराव असताना प्रवेशद्वारासाठी टाळाटाळ केली जात असल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात आम्ही प्रवेशद्वार उभारल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत आणि तसे पत्र स्थानिक ग्रामपंचायतीला दिले आहे. तरीही आंदोलनकर्ते अडून बसले होते.