नागपूर : अवघ्या देशभरात सुप्रसिद्ध असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि तेथील वारीची, संत परंपरेची गाथा आता जगभरात पोहोचणार असून काही वर्षात लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणीचे भव्यदिव्य मंदिर साकारण्यात येणार आहे. विष्णू मनोहर आणि व्यवस्थापन तज्ज्ञ व एलआयटी विद्यापीठाचे प्रधान सल्लागार मोहन पांडे हे नागपूरकर या मंदिर समितीचे सदस्य व भारतातील समन्वयक आहेत.
याबाबत माहिती देताना शेफ विष्णू मनोहर म्हणाले, अमेरिका, यूरोप, लंडन येथे इस्कॉन, अक्षरधाम, बालाजी तसेच राजस्थान येथील देवतांची मंदिरे अशी अनेक भारतीय मंदिरे आहेत. मात्र, एवढी जुनी संत साहित्य परंपरा असलेले पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाईचे मंदिर तिकडे नाही. ही कमतरता भरून काढण्यासाठी लंडन येथील श्री विट्ठल रुक्मिणी मंदिर टीम प्रयत्नशील असून वारीला सातासमुद्रापार नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. खरे तर दिंडीतील पादुका विमानातून लंडन येथे जाऊ शकतात. पण समर्पण म्हणून सुखी संसाराची वाट सोडून लाखो भाविक पायी वारी करतात. ही बाब ध्यानात घेऊन वारीचा योजना करण्यात आली असून सुमारे २२ देशातून १८००० किलोमीटरचा ही दिंडी प्रवास करणार आहे आणि भक्तीची परंपरा भारताबाहेर पोहोचवणार आहे.
१५ एप्रिलला पंढरपूर येथून पादुका मार्गस्थ होणार आहे. तर १६ तारखेला त्या नागपुरात येतील. येथे सायंकाळी पाच वाजता विष्णू जी की रसोई येथे दर्शनासाठी ठेवण्यात येतील. नंतर त्या १८ एप्रिलला भारत सोडून नेपाळ, चीन, रशिया, यूरोप अशा २२ देशातून ७० दिवसात १८ हजार किलोमीटर एवढा प्रवास करतील. या निमित्ताने बावीस देशातून वारीचा सुगंध जगभरात दरवळणार आहे. यासाठी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पुर्ण सहकार्य केले असून कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, चैतन्य उत्पात यांनी उत्तम नियोजन केले आहे.
या उपक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार उदयनराजे भोसले, एमआयटीचे विश्वनाथ कराड व वारकरी संप्रदायाच्या व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या असून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. लंडनमधील चारपेक्षा अधिक मराठी मंडळ, आखात, जर्मनी, आयर्लंड, अमेरिका येथील मराठी मंडळ संलग्न होत असून लवकरच भव्य मंदिर उभे करण्यात येणार आहे. तामीळ, कानडी, गुजराथी, तेलगू भाविकही या निमित्ताने जोडले जात आहेत. या लोकांना मराठी भाषा येत नाही, पण अभंग म्हणता येतात. महाराष्ट्र राज्यातील सातशे वर्षांची जुनी परंपरा, राज्याचे आराध्य दैवत श्री विठ्ठल जगभरात पोहोचणार आहे.
© The Indian Express (P) Ltd