लोकसत्ता टीम

अकोला : नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. दहावी, बारावी, कृषी पदविका, पदवीधर ही पात्रता असलेल्या शेकडो उमेदवार यांची नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा शुक्रवारी, २१ मार्च रोजी सकाळी १० वाजता शहरातील रतनलाल प्लॉट येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आला आहे. त्यात राज्यातील विविध नामांकित कंपन्यांतील २६० पदे भरण्यात येतील, असे सहायक रोजगार आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी सांगितले.

अनेक विभागांमध्ये नोकऱ्यांची मोठी संधी असते. सुशिक्षित तरुण-तरुणी देखील नोकरीचा शोध घेण्यासाठी भटकंती करीत असतात. या सर्व पार्श्वभूमीवर नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. रोजगार मेळाव्याच्या माध्यामातून विविध रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. अकोला येथे भारतीय जीवन विमा निगमकडून विमा सखी योजनेत २० पदे भरली जाणार आहेत. २५ ते ६५ दरम्यान वय असलेल्या बारावी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येईल. रौनक एलईडी बल्ब या आस्थापनेत पाच जागांसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येईल.

छत्रपती संभाजीनगर येथील नवभारत फर्टिलायझर्स येथे ४० जागा भरण्यात येत असून, १८ ते ३५ वयोगटातील दहावी, बारावी, पदवीधर, कृषी पदविका किंवा पदवीधर आदी पात्रता असलेल्या उमेवारांना अर्ज करता येईल. पुणे येथील एसएस इन्फोटेक येथे १६० पदांची मागणी आहे. १८ ते ४० वयोगटातील दहावी, बारावी, पदविकाधारक, पदवीधरांना अर्ज करता येईल. त्याचप्रमाणे, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेत विविध महाविद्यालयांतील ३५ पदांसाठी बारावी, पदवीधर, एमएससीआयटी उत्तीर्ण आदी पात्रताधारकांना अर्ज करता येतील.

विभागाच्या महास्वयम या पोर्टलवर नोंदणी करून इच्छूकांनी कागदपत्रांसह २१ मार्च रोजी आयटीआय येथे उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक रोजगार आयुक्तांनी केले आहे.

मेळाव्यातून रोजगाराची संधी

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपासून पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यात रोजगाराची संधी मिळावी, यासाठी शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावे घेतले जात आहेत. प्रत्येक तीन महिन्यातून एकदा हा रोजगार मेळावा घेऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते.