यवतमाळ : नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या घटनेनंतर यवतमाळ जिल्हा प्रशासन दक्ष झाले. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शनिवारी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह स्त्री रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी वैद्यकीय महाविद्यालयात अनेक ठिकाणी अस्वच्छता आढळून आली. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून याप्रकरणी दोन स्वच्छता निरीक्षकांसह चौघांना निलंबित करण्यात आले. या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली.
नांदेडच्या घटनेनंतर सरकारी रुग्णालयांमधील अनागोंदी बाहेर आली. अनेक रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत असल्याचे निदर्शनास आले. अपुरे कर्मचारी, अपुरा औषधीसाठा यामुळे रूग्ण व त्यांचे नातेवाईक त्रस्त असल्याची ओरड सुरू झाली. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यवतमाळातील दोन्ही सरकारी रुग्णांलयांना भेट देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी दोन्ही रुग्णालयांतील वॉर्डांची पाहणी केली. स्वच्छतागृहे तपासली. तसेच रुग्णांशीही संवाद साधला. अनेक रुग्णांनी असुविधांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला. अनेक वॉर्डात अस्वच्छता आढळली. स्वच्छतागृहे अस्वच्छ आढळली. त्यामुळे याबाबत वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनास खडेबोल सुनावले. यासाठी जबाबदार असणाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले. सोमवारी या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात येवून रुग्णालय प्रशासनाच्यावतीने दोन स्वच्छता निरीक्षकांसह एक हवालदार आणि वर्ग-४ च्या एका कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले. या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.