वर्धा : ७२ तासांपूर्वीची धाकधूक अखेर आज सकाळी संपली. तीन दिवसांपूर्वी सदर प्रतिनिधी सोबत बोलताना आमदार डॉ. पंकज भोयर म्हणाले होते की, मंत्रिपदाची शक्यता आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक संदेश दिल्याचे ते म्हणाले. मी घरी पण सांगितले नाही. कृपया सध्याच बातमी करू नका, अशी विनंती पण करायला ते विसरले नाही.

आज सकाळी आठ वाजता बावनकुळे यांचा परत फोन आला. परिचित रिंगटोन असल्याने आमदार भोयर यांची धाकधूक संपली. शपथविधीसाठी तयार रहा, हे शब्द भोयर यांच्या राजकारणास सार्थकी लावून गेले. २०१४ सालची आठवण ताजी झाली. ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्यासोबत ते भाजपमध्ये आले. वर्धेत उमेदवार कोण ठरणार, याची चर्चा सुरू असताना मेघे यांनी भोयर यांचे नाव दिले. मात्र ते अन्य एका नावामुळे कटले. तेव्हा खासदार रामदास तडस यांनी, हे काय लावलं, आम्ही तिकीट मिळाल्याचे गृहीत धरून कामाला लागलो आणि तुम्ही नाही कसे म्हणता. हे शब्द पुरेसे ठरले आणि तेव्हापासून ते आतापर्यंत सलग तीन वेळा आमदार झालेले डॉ. भोयर आज मंत्रिपदाची शपथ घेणार.

हेही वाचा – आठ दिवसांपूर्वी बेपत्ता, अखेर मृतदेहच हाती लागला; ‘त्या’ पोलिसाच्या आत्महत्येचे गुढ…

कधी काळी काँग्रेस नेते माजी आमदार रणजित कांबळे यांचे शिष्य राहिलेले भोयर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद भूषवून चुकले. मात्र भाजपमध्ये आल्यावरच त्यांचे नेतृत्व फुलले. कधीच कोणाला नाराजच नव्हे तर साधे दुखवायचे पण नाही, हा स्वभाव व अत्यंत निगर्वी वर्तन हे त्यांचे वैशिष्ट्य सांगितले जाते. वडिलांच्या शिक्षण संस्थेत काम करताना बरेच काही शिकायला मिळाल्याचे ते सांगतात.

हेही वाचा – आरटीई प्रवेश प्रक्रिया यंदा वेळेवर? शाळा नोंदणीस १८ डिसेंबरपासून प्रारंभ

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडून पक्षशिस्तीचे धडे मिळाले. पुढे वळून मग पाहिलेच नाही. मोदी असो की फडणवीस यांची सभा वर्ध्यात घ्यायची असेल तर सर्वप्रथम खांदे भोयर यांचेच तयार असतात. भाजप नेमका कसा पक्ष आहे व तो कसा चालतो, याचे पूर्ण ज्ञान झालेल्या भोयर यांनी पक्षात गटाचे राजकारण मुद्दाम टाळले. म्हणून माजी खासदार रामदास तडस हेच त्यांचे नाव मंत्रीपदासाठी रेटण्यात सर्वात पुढे असतात. सेलू भागात भोयर यांना मते मिळावी म्हणून पक्षातील सर्व गत सरसावतात. मोदी यांची दोन महिन्यांपूर्वी वर्ध्यात सभा झाली तेव्हा त्याचे नियोजन पाहून खुद्द बावनकुळे प्रसन्न झाले होते. आज पक्षात इतर सर्व ज्येष्ठ आमदार व अस्सल भाजपचे असलेले आमदार मागे पाडून डॉ. भोयर यांची वर्णी लागते, याचे कारण म्हणजे त्यांचे संघटन कौशल्य, स्वभाव व पक्षशिस्तीचे पालन, यास दिले जाते.

Story img Loader