लोकसत्ता टीम

नागपूर : गेल्या पंधरा वर्षापासून राजकारणात असून राज्यात आणि केंद्रात अनेक पदावर काम केले आहे. मात्र आगामी काळात राज्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे सांगण्याइतकी माझी पात्रता नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचा मुख्यमंत्री राहील, असे मत भारतीय जनता पक्षाचा नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. पंकजा मुंडे त्यांच्या भेटीसाठी नागपुरात आल्या असता त्या विमानतळावर बोलत होत्या.

विमानतळावरून त्या बावनकुळे यांच्या निवासस्थानी गेल्या आणि त्यांची भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्याच्या राजकारणापासून गेल्या काही दिवसांपासून दूर असली तरी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात काम करण्याची संधी मिळणार आहे. गेल्या पाच वर्षात माझ्या पाठीशी अनेक लोक खंबीरपणे उभे राहिले. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर संधी मिळाल्यास राज्याच्या विकासासाठी काम करणार आहे. लोकसभा लढण्याची संधी मिळाली मात्र पराभवाने खचली नाही. निराशा आली होती मात्र राजकारणात पराभव स्वीकारावे लागतात. मात्र लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी हताश होऊन आत्महत्या केली. त्यात अनेकांनी माझ्यासाठी जीव देण्याची तयारी केली होती, मात्र तो प्रवास माझ्यासाठी फारच वेदनादायी होता.

आणखी वाचा-बुलढाणा : ‘भक्तिमार्गा’विरोधात शेकडो शेतकरी रस्त्यावर, चिखलीत ‘रास्ता रोको’

त्या पुढे म्हणाल्या, माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आत्महत्या करत असेल तर मी राजकीय जीवनात सहन करु शकत नाही. ज्या मुलाने आत्महत्या केली त्यांच्या निवासस्थानी गेले असताना मला अश्रू थांबवता आले नाही असेही त्या म्हणाल्या. माझ्या सर्वच मतदारांचे मी आभार मानले. विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भात काय होणार आहे हे उद्या कळेल. अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. भाजपकडून पाच उमेदवार आहे. जो काही पक्षातील ज्येष्ठ नेते आदेश देतील त्या प्रमाणे पुढची दिशा ठरणार आहे. निवडणूक झाली तरी महायुतीमधील सर्व उमेदवारामध्ये जिंकण्याचा आत्मविश्वास आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

विनोद तावडे राज्यात सक्रिय होतील, अशी चर्चा आहे. मात्र त्या चर्चा बद्दल मी काही सांगू शकत नाही. जोपर्यंत जे सत्यात उतरत नाही त्यावर बोलणे उचित नाही. विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्यावर मला मंत्रीपद मिळेल की नाही याबाबत मला काही माहित नाही. एखाद्या गोष्टीनंतर केवळ चर्चा होत असते मात्र प्रत्यक्षात ते उतरले असे वाटत नाही असेही त्या म्हणाल्या.

आणखी वाचा-अमरावती : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेवरून पुन्हा मतभेद, विधानसभेत…

पंकजा मुंडे नागपुरात आल्यावर त्यांनी कार्यकर्त्यानी स्वागत केले. यावेळी विमानतळावर आलेल्या प्रवाशांनी त्यांच्यासोबत छायाचित्र काढले तर त्यांच्या सोबत आलेल्या एका लहान बाळाला कडेवर घेत त्यांच्याशी गप्पा करत छायाचित्र काढले.