नागपूर : मागील आठवड्यात परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यावर संतप्त आंबेडकरी संघटनांनी बंद पुकारला होता. या बंद दरम्यान परभणीमध्ये हिंसाचार उसळला. याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी मोठा आरोप केला.

आंबेडकरी संघटनांनी शांतीपूर्ण बंदची हाक दिली होती मात्र यात काही हिंदुत्ववादी संघटनांनी तोडफोड करत आंबेडकरी चळवळीला बंद करण्याचा कट रचला आहे, असा आरोप अंधारे यांनी नागपूरमध्ये एका पत्रपरिषदेत केला.

हेही वाचा – “९ कोटींसाठी एका तरुणाचे अपहरण…”, नाना पटोलेंचा रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप

काय आहे आरोप?

संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यावर आंबेडकरी संघटनांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्या उपस्थिती शांती बैठक घेतली. जिल्हाधिकारी यांनी स्वतः बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला. या नंतर आंबेडकरी संघटना यांनी विरोध प्रदर्शित करण्याकरिता शांतीपूर्ण बंद पुकारण्याची घोषणा केली. ज्या दिवशी आंबेडकरी संघटना यांनी बंद पुकारला होता, त्याच दिवशी भाजपच्या वतीने बांगलादेशी हिंदूंसाठी मोर्चा काढण्यात आला. आंबेडकरी संघटनांनी पुकारलेला बंद दुपारपर्यंत शांतीत सुरू होता. मात्र दुपारनंतर भाजपच्या मोर्च्यात सहभागी काही लोकांनी निळे दुप्पटे घेत हिंसाचार केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बंदबाबत माहिती होती, त्यांनी प्रतिबंधात्मक उपाय करण्याची गरज होती. आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्यासाठी बंदच्या नावाखाली तोडफोड करण्यात आली, असा आरोप अंधारे यांनी केला.

हेही वाचा – फडणवीसांचाच प्रस्ताव स्वीकारायला हवा होता… शपथविधीनंतर शिंदेंच्या आमदाराकडून उघड…

हिंसाचार कुणी केला? त्यांची चौकशी का होत नाही आहे? असे विविध प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केले. पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनच्या नावावर दलित तरुणांना अटक करत बेदम मारहाण केली. यात एका विधी क्षेत्रातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील अंधारे यांनी केली.

Story img Loader