नागपूर : ‘आरटीई’ अंतर्गत मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करणाऱ्या दोन पालकांना सदर आणि सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. दोघांनाही तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. राजेश बुआडे (३५) रा. अजनी याला सदर पोलिसांनी तर श्यामशंकर सत्यनारायण पांडेय (मानकापूर) याला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात प्रथमच पालकांना अटक झाली आहे.
‘आरटीई’ घोटाळा उघडकीस आल्यावर त्याचा तपास करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने दोन दिवसांपासून छापेमारी सुरू केली होती. मंगळवारी या प्रकरणातील म्होरक्या शाहिद शरीफ यांने उघडलेल्या समांतर खासगी ‘आरटीई’ कार्यालयावर छापा घातला होता. या प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या १७ पालकांपैकी बुधवारी श्यामशंकर सत्यनारायण पांडे व राजेश बुआडे या दोन पालकांना अटक करण्यात आली श्यामशंकर हा एका मोठ्या कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत असून त्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे.
हेही वाचा…ऊन-पावसाचा लपंडाव! कुठे पावसाच्या सरी तर कुठे घामाच्या धारा; हवामान खाते म्हणते…
मात्र, त्याने शरीफच्या माध्यमातून मुलाला भवन्समध्ये प्रवेश मिळवून घेतला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पांडेय याचे उत्पन्न लाखोंमध्ये असताना आरटीईतून पाल्याला प्रवेश मिळवण्यासाठी उत्पन्नाचा बनावट दाखला तयार केला. त्यामुळे पात्र नसतानाही त्याने मुलाला प्रवेश मिळवून घेतला, असे बर्डीचे ठाणेदार अशोक चोरमोले यांनी सांगितले.
सदर पोलिसांनी राजेश बुआडे याला अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. त्यानेही मुलाच्या शाळा प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे तयार केली आहे. याप्रकरणी गट शिक्षण अधिकारी दुर्गे यांच्या तक्रारीवरुन सदर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. बुआडे याचे आईस्क्रिम पार्लर आहे. त्याने एका नामांकित शाळेत मुलीच्या नर्सरीत प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे दिली होती. तसेच पत्ताही चुकीचा होता. पोलिसांनी त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवला व त्याला अटक केली.
हेही वाचा…अमरावती : विवाहितेचे अपहरण करून अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
शाहिद शरीफचे साम्राज्य
‘आरटीई’च्या राखीव कोट्यातून शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी ‘आरटीई’चे समांतर खासगी कार्यालय सीताबर्डीतील लक्ष्मी टॉकिजजवळील दलाल शाहिद शरीफ याने उघडले होते. या खासगी कार्यालयात एक ते दीड लाख रुपये घेऊन पालकांना नामांकित शाळेत पाल्यांना प्रवेश मिळवून देण्यात येत होता. आरटीई दलालांच्या टोळीचा शाहिद शरीफ हा म्होरक्या असून त्याने आतापर्यंत शेकडो पाल्यांना नामांकित शाळेत आरटीईअंतर्गत प्रवेश मिळवून दिल्याचे समोर आले. त्याच्या कार्यालयावर मंगळवारी पोलिसांनी छापा घालून दस्तावेज जप्त केले होते. तसेच कार्यालयही सील केले होते. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा…फडणवीस पालकमंत्री, तरीही नागपूरमध्ये नझूलच्या जागेवरील पट्टे वाटप रखडले
शरीफच्या घरावर छापा
‘आरटीई’ अंतर्गत प्रवेश मिळवून देण्याच्या गोरखधंद्यातून शाहिद शरीफने मोठ्या प्रमाणात काळा पैसा कमावला. तो पैसा त्याने घरी ठेवला असून अनेक पाल्यांचे बनावट कागदपत्रसुद्धा घरी ठेवले होते. त्यामुळे सीताबर्डी आणि धंतोली पोलिसांनी शरीफच्या घरावर छापा घातल्याची माहिती सूत्रांनी दिली. शरीफ आणि त्याच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यातही लाखोंमध्ये पैसे असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.