भंडारा : शाळेतील शिक्षिका आणि एकल किंवा विधवा महिला पालकांना रात्री अपरात्री फोन करून शाळेचे मुख्याध्यापक अश्लील संभाषण किंवा व्हिडिओ कॉल करीत असल्याच्या महिला पालकांकडून तक्रार येताच संस्थेने मुख्याध्यापकाना पदावरून पायउतार केले. पण ते सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत होते. मुख्याध्यापकाच्या विरोधात तक्रारी असताना सुद्धा शिक्षणाधिकाऱ्यानी पुन्हा त्यांची प्रभारी मुख्याध्यापकपदी नियुक्त केल्याचा आरोप संस्था चालकांसह शिक्षकांनी केला आहे. या प्रभारी मुख्याध्यापकाला पदावरून न हटवल्यास सर्व शिक्षक उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री यांना देण्यात आला आहे. दरम्यान मुख्याध्यापकांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले
हा धक्कादायक प्रकार लाखनी येथील समर्थ प्राथमिक विद्यालयात समोर आला आहे. प्रकरण असे की, सेवाज्येष्ठता नियमानुसार मनोज कुमार कावळे हे १ ऑगस्ट २०२० ते ३० एप्रिल २०२३ या काळात प्रभारी मुख्याध्यापकपदी कार्यरत होते. त्याकाळात त्यांच्याविरुद्ध शाळेतील शिक्षिका आणि महिला पालकांना मानसिक त्रास देणे व तत्सम तक्रारी शिक्षकांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. भंडारा यांच्याकडे केल्या. मात्र शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष करून मनोज कावळे यांची नियमबाह्य पद्धतीने समर्थ प्राथमिक विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापकपदी पुन्हा नियुक्ती केली, असा आरोप शिक्षकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. याशिवाय शाळेतील एकल महिला पालकांना रात्री बेरात्री मॅसेज करून फोन करणे, अश्लील संभाषण करणे, शाळेत वारंवार भेटायला बोलावणे असे अनेक गैरकृत्ये केल्याने संतप्त महिला पालकांनी संस्था चालकांकडे तक्रारी सुध्दा केल्या. आपल्या मुलांना त्रास होऊ नये याकरिता निमूटपणे मुख्याध्यापकांचे वागणे सहन केले असल्याचेही काही महिला पालकांनी सांगितले.
नाव न छापण्याच्या अटीवर एका शिक्षिकेने सांगितले की, “या प्रकरणात मध्यस्थी करून संस्थेने प्रकरणे सोडवली. परंतू मनोज कावळे हे प्रभारी मुख्याध्यापक असल्याने त्यांच्या विरोधात तक्रार केल्यास ते संस्थेला प्रशासकीय अडचणीत अडकवू शकतात, अशी भीती होती. कावळे यांच्या अशा कृत्यांमुळे आमच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून आम्हाला कावळे हे मुख्याध्यापक पदावर नको आहेत. त्यांची, वासनांध प्रवृत्ती शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना माहित असून प्रभारी पदावर असल्याने आजवर कोणीही त्यांच्याविरोधात तक्रार करण्याची हिंमत केली नाही.”
एका शिक्षिकेने सांगितले की, समर्थ विद्यालय लाखनी या संस्थेचे अंतर्गत वादातील एक प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सद्यास्थितीत कुणालाही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही, असे न्यायलयाने आदेशित केले आहे. त्यामुळे प्रभारी मुख्याध्यापक कावळे यांच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे अधिकार शाळेला नव्हते. मात्र महिला पालकांकडून तक्रार येताच मनोजकुमार कावळे मुख्याध्यापक पदाचा फायदा घेत महिलांना वेठीस धरत असल्याचे लक्षात येताच त्यांना मुख्याध्यापक पदावरून काढून सहाय्यक शिक्षक पदी ठेवण्यात आले. मात्र प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी नियमबाह्य पद्धतीने कावळे यांना पुन्हा मुख्याध्यापक पदी नियुक्ती केल्याचा आरोप संस्थाचालकासह शिक्षकांनी केला आहे. या निर्णयाविरोधात संस्थाचालकासह १३ शिक्षकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी सांगितले की, सेवाज्येष्ठ शिक्षकाला मुख्याध्यापक पदभार देण्याबाबत नियम आहे. त्यानुसार सुनावणी घेऊन पदभार देण्यात आला आहे. निर्णय मान्य नसल्यास शिक्षण उपसंचालकांकडे अपील करणेबाबत पत्र दिले आहे मात्र संस्था अपील करीत नाही.
माझ्याविरोधात बनाव -कावळे
माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आणि चुकीचे आहेत. मी मुख्याध्यापक असताना मला अशा कोणत्याही प्रकारचे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली नव्हते. मी पुन्हा मुख्याध्यापक पदावर नियुक्त होणार म्हणून माझ्याविरोधात हा डाव रचण्यात येत आहे. – मनोजकुमार कावळे, प्रभारी मुख्याध्यापक, समर्थ प्राथमिक विद्यालय लाखनी.