नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षांना मंगळवार ११ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. नागपूर विभागातून १ लाख ५८ हजार ५३७ विद्यार्थी ५०४ केंद्रांवरही परीक्षा सुरू आहे.परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी महसूल विभागाच्या मदतीने यंदा प्रत्येक परीक्षा केंद्रावर यावेळी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर होणाऱ्या परीक्षेतील गैरप्रकारावर यंदा शिक्षण मंडळाची नजर आहे. परंतु, नागपुरातील एका परीक्षा केंद्राबाहेर गुरुवारी काही पालकांनी गोंधळ घातला. परीक्षा केंद्रामध्ये काही विद्यार्थ्यांना भ्रमनध्वनी घेऊन जाताना पकडण्यात आल्याचा दावा पालकांनी केला.

काही विद्यार्थ्यांना भ्रमनध्वनी नेण्यास सुविधा देण्यात आली असा आरोप पालकांचा आहे. त्यामुळे परीक्षेच्या सुरक्षेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे विभागीय शिक्षण मंडळाने असा कुठलाही प्रकार घडणे शक्यच नाही असा दावा केला आहे. अशी कुठलीही तक्रार असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करून परीक्षा केंद्रच बंद केले जाईल, अशी माहिती दिली.

तीन दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यामध्येही परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप झाला होता. गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील एका परीक्षा केंद्रावर बारावी भौतिकशास्त्राचा पेपर बाहेर आला असून सर्व प्रश्न उत्तरांची छायांकित प्रत बाहेर आली आहे. बारावी परीक्षेदरम्यान केंद्रावर सर्रास कॉपी सुरू असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. या प्रकारामुळे काॅपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागाला या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

बारावी विज्ञान शाखेचा भौतिकशास्त्राचा पेपर होता. शहरातील एका केंद्रावर त्याच शाळेतील एक विद्यार्थी बारावीचा पेपर देत असताना त्याला हा प्रकार आढळून आला. त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केंद्रावर मिळालेली छायांकित प्रत दिली. छायांकित कॉपीवर एकूण नऊ प्रश्नांची उत्तरे लिहिलेली आढळली. यावरून प्रश्नसंच बाहेर गेलाच कसा व त्याची उत्तरे सोडवून छायांकित प्रत केंद्रावर आली कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या प्रकारात केंद्रावर अधिनस्त असलेले शिक्षक सामील तर नाहीत ना असा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. तर हुशार विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होत असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर नागपूरमधील एका परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थी मोबाईल घेऊन जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

Story img Loader