वर्धा : बुलढाणा येथे १ जुलैला झालेल्या बस अपघातात वर्धा येथील १४ व्यक्तींचा बळी गेला. त्यांच्या पालकांच्या वेदना अद्याप ओल्या आहेत. तर सदर बसच्या ट्रॅव्हल्स मालकाकडून संवेदनाशून्य उत्तरे येत आहेत. अपघात घडल्यानंतर मृत प्रथमेश खोडेची आई नीलिमा खोडे यांनी ट्रॅव्हल्स मालक दरणे यांना फोन केला होता. त्यावेळी, तुमचे दुःख चार दिवसाचे. माझी तर बस जळून खाक झाली, असे उत्तर देत फोन कापला, अशी व्यथा नीलिमा खोडे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – नागपूर : आदिवासी आश्रम शाळांमधील निम्म्या विद्यार्थ्यांना कशाचे आहे व्यसन?
दुःखी कुटुंबियांनी काही बाबी माध्यमांसमोर मांडल्या. चालक मद्यधुंद असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चालक व सोबतच निष्काळजीपणा दाखविणाऱ्या मालकावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या ट्रॅव्हल्सची मान्यता रद्द करावी. ट्रॅव्हल्सच्या बाबतीत कठोर नियम लागू करावे. वाहन चालकाची एक फेरी झाल्यानंतर त्याला दुसरी फेरी देऊ नये. वाहनाची गती बांधलेली असावी. समृद्धी मार्गावर शंभर किलोमिटरवर प्रवास झाल्यास एक थांबा अनिवार्य करावा. तिकीट रद्दबाबत धोरण असावे. नागपूर ते पुणे रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी. अपघाताच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, असा पालकांचा सूर राहिला. याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना भेटून अवगत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.