भंडारा : पालकांकडून भरमसाठ शुल्क आकारल्याची तक्रार केली म्हणून तुमसर येथील फादर एंजल स्कूलच्या सात विद्यार्थ्यांना शाळेतून काढल्याचे प्रकरण तापलेले असताना लाखनी येथील एका शाळेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आमदार नाना पटोले यांना निवेदन देत संतप्त पालकांनी तक्रार केली आहे.

सध्या खासगी शाळांच्या मनमानी कारभारामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. असाच प्रकार लाखनी तालुक्यातील केसलवाडा येथील एम.डी.एन. फ्यूचर स्कूलमध्ये होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. अवाजवी शुल्क, अनावश्यक खर्च आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे अनेक पालक त्रस्त असून, शाळा प्रशासनावर कारवाईची मागणी जोर करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून खासगी शाळांमध्ये फीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात अनेक शाळांनी कोणतीही पूर्वसूचना न देता फीमध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. याशिवाय, पुस्तके, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्यासाठी अवास्तव दर आकारले जात असल्याचे तक्रारी पालक करीत आहे.

एम.डी.एन. फ्यूचर स्कूल या स्वयंअर्थसहाय्यित शाळेवर पालकांनी गंभीर आरोप केला असून, यासंदर्भात (दि.३) एप्रिल रोजी भंडारा येथे एक तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत शाळेच्या मुख्याध्यापक आणि संचालक मंडळावर शुल्क विनियमन कायद्याचे उल्लंघन, आर्थिक शोषण आणि पालक-शिक्षक संघटनेच्या नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

शमीम शफी आकबानी आणि अक्षय चंद्रशेखर खेडीकर यांनी या विरोधात शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद भंडारा, धर्मादाय आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच आमदार नाना पटोले यांच्याकडे (दि.५) एप्रिल रोजी निवेदन देत तक्रार केली आहे.

शाळेने महाराष्ट्र शिक्षण संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११, २०१४, २०१६ आणि २०१८ च्या तरतुदींचे उल्लंघन करून शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी पालक-शिक्षक संघटनेच्या संमतीशिवाय मनमानी पद्धतीने शुल्क आकारणी केल्याचा आरोप आहे.

अप्रशिक्षित शिक्षक

शाळेमध्ये डीएड, बीएड अहर्ता नसलेल्या शिक्षकांद्वारे अध्यापन केले जात असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्यच धोक्यात येत आहे असाही आरोप करण्यात आला आहे.

शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी सक्ती

शुल्कवाढीसोबतच या खासगी शाळेत पालकांना वह्या, पुस्तके, गणवेश, दप्तर व इतर शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करावे, अशी सक्ती पालकांना केली जात आहे. यासाठी पालकांकडून बाजारभावापेक्षा अवाजवी शुल्क घेतले जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा देण्यात आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पालक-शिक्षक संघटनेच्या कार्यकारी समितीत अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती आणि इतर मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व देण्यात आले नसल्याचा आरोप आहे.तक्रारीत शाळेवर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शुल्क वाढीबाबत पालक शिक्षक सभेत सूचना देण्यात आली होती. शिवाय सात वर्षांनंतर शुल्कवाढ करण्यात येत आहे. शाळेतून पुस्तके घेण्यासाठी पालकांना कोणतीच सक्ती केली जात नाही. शिक्षक भरतीमुळे काही शिक्षक मधून शाळा शोधून गेल्यामुळे काही शिक्षकांची पात्रता नाही. मात्र या वर्षी शिक्षक भरती करणार आहोत. –राजेश निनावे, प्राचार्य एमडीएन फ्यूचर स्कुल