लोकसत्ता टीम
नागपूर: शाळा प्रवेशासाठी सध्या पालकांची धावपळ दिसून येत आहे. मात्र, यातही ठराविक शाळांमध्येच प्रवेश मिळावा म्हणून पालकांची धावाधाव सुरू आहे. त्यामुळे पाल्यांच्या प्रवेशासाठी जणू पालकांचीच ‘परीक्षा’ होत असल्याची स्थिती आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाच पसंती दिली जात असून पसंतीच्या शाळेत प्रवेश न मिळाल्याने अनेकांचा हिरमोडही होत आहे.
शाळा जून महिन्यात सुरू होतात. मात्र, प्रवेशप्रक्रिया दोन महिन्यांआधीच सुरू होते. सध्या शहरातील बहूतांश खासगी सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश अर्जांची विक्री बंद झाली आहे. मात्र, राज्य मंडळाच्या खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश अर्ज सुरू झाले आहे.
त्यामुळे पालक आपल्या पसंतीच्या शाळांमध्ये पाल्याला प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. धंतोली येथील माउंट कार्मेल शाळेच्या प्रवेश अर्जासाठी पालकांनी शाळेबाहेर मुक्काम ठोकला होता. शहरात इंग्रजी माध्यमाच्या दोनशेहून अधिक शाळा आहेत. यातील सीबीएसई शाळांमध्ये फेब्रुवारी महिन्यांत प्रवेश प्रक्रिया सुरू होते. तर राज्य मंडळाच्या शाळांमध्ये एप्रिल ते मे महिन्यात प्रवेशाची प्रक्रिया असते.
आणखी वाचा-नागपूर: चार महिने उलटूनही अनेक परीक्षांचे निकाल नाही, विद्यापीठाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह
यातील पसंतीच्या शाळेतच प्रवेश मिळावा म्हणून पालक अधिक काळजी घेताना दिसतात. त्याचप्रमाणे काही पालक दोन ते तीन शाळांचे प्रवेश अर्ज घेऊन ठेवतात. पसंतीच्या शाळांमध्ये प्रवेश नाही झाला तर दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येईल, अशीही सोय करून ठेवतात. सध्या शहरातील बहूतांश शाळांमध्ये प्रवेशासाठी पालकांच्या रांगा असल्याचे दिसून येत आहे.
सीबीएसई शिक्षणाकडे वाढता कल
पालकांचा हल्ली सीबीएसई माध्यमाच्या शाळांमधील प्रवेशाकडे कल वाढल्याचे दिसून येते. एका सीबीएसई शाळेतील शिक्षिका शर्मिला जोशी यांनी सांगितले की, राज्य मंडळाच्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या असल्या तरी पालकांना आपली मुलं सीबीएसई शाळेतच शिकावी असा हट्ट असतो. याचाच परिणाम म्हणून शहरात आज सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशासाठी गर्दी आहे. सुरुवातीला एखादीच नामवंत सीबीएसई शाळा राहत असे. मात्र, आता एकाच शाळेच्या शहरात दहा नवीन शाळा तयार झालेल्या दिसून येतात. हा पालकांचा सीबीएसई शिक्षणाकडे वाढता कल असल्याचे दिसून येते असे जोशी म्हणाल्या.
पालकांनी शाळा प्रवेशासाठी आपल्या घराच्या नजिक असलेल्या शाळांमध्ये प्रवेशाला प्राधान्य द्यावे. त्यामुळे पाल्यांची गैरसोय होणार नाही. तसेच शाळांनीही प्रवेश देताना सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे. -वैशाली जामदार, शिक्षण उपसंचालक.