लोकसत्ता टीम

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’च्या माध्यमातून २९ जानेवारी रोजी विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यासाठी शाळांमध्ये दूरचित्रवाणी, संगणक व मोठ्या स्क्रीन लावण्याचे आदेश धडकताच जिल्हा शिक्षण विभाग तयारीत गुंतला आहे. वर्ग ६ ते १२ वीपर्यंतच्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत साहित्य जुळवाजुळवीसाठी शिक्षणाधिकाऱ्यांपासून मुख्याध्यापक व शिक्षकांची धावपळ सुरू झाली आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी व मार्च महिन्यात होत आहेत. परीक्षा काळात पंतप्रधान मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. येत्या २९ जानेवारी रोजी ‘परीक्षा पे चर्चा’च्या माध्यमातून पंतप्रधान विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी संवाद साधतील. या संवादाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन, रेडिओ, अधिकृत संकेतस्थळ तसेच फेसबुक व इतर समाज माध्यमांवर केले जाणार आहे. हा संवाद कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक व पालकांना थेट पाहता यावा यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत संगणक, दूरचित्रवाणी, रेडिओ, ट्रांझीस्टर व मोठ्या स्क्रीन लावण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा नोडल अधिकारी शरद गोसावी यांनी दिले आहेत.

आणखी वाचा-नागपूर : पूर्व विदर्भात ‘डेंग्यू’च्या रुग्णांत चारपट वाढ!

शिक्षण मंडळाकडून आदेश येताच शिक्षणाधिकारी कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे, ज्या शाळांमध्ये दूरचित्रवाणी संच नाहीत तेथे भाडेतत्त्वावर घेऊन व्यवस्था करावी, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षक आता दूरचित्रवाणी आणि मोठ्या स्क्रीनची जुळवाजुळव करीत आहेत. शहरी भागातील शाळा सोडल्या तर बहुसंख्य शाळांमध्ये वीज नाही. माणिकगड पहाड, जिवती, कोरपना तसेच इतरही काही तालुक्यांतील अनेक शाळांमध्ये दूरचित्रवाणीची व्यवस्था नाही. अशावेळी दूरचित्रवाणी आणायचा कुठून, असा प्रश्न तेथील शिक्षकांना पडला आहे.

आणखी वाचा-भंडारा : आयुध निर्माणी कंपनीत भीषण स्फोट; एका कर्मचाऱ्याचा मृत्यू

शिक्षण मंडळाचे निर्देश काय?

या कार्यक्रमासाठी समग्र शिक्षाअंतर्गत उपलब्ध निधीचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनी करावा, अनुदानित शाळांनी दूरचित्रवाणी भाडेतत्त्वावर घेऊन व्यवस्था करावी, असे सूचित करण्यात आले आहे. या कार्याचा अहवाल विभागीय उपसंचालक यांच्या मार्फत संचालनालयाला सादर करावा तसेच कार्यक्रमाची छायाचित्रे व तपशील कार्यक्रम संपल्यानंतर लगेच ‘माय गव्हर्नमेंट’ या ‘पोर्टल’वर अपलोड करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत. शिक्षण मंडळाचे निर्देश येताच मुख्याध्यापक, शिक्षक साहित्यांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Story img Loader