गोंदिया : विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात काय दिवे लावले ते सांगितले तर बरे होईल. ओबीसी मंत्री असताना ओबीसी समाजासाठी काहीही न करणारे वडेट्टीवार आज भाजप-शिवसेना सरकारवर टीका करीत आहे. त्यांना या सरकारवर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया गोंदियाचे माजी पालकमंत्री परिणय फुके यांनी दिली.
हेही वाचा >>>नागपूर: विहिरीतील गाळ काढायला गेले अन अघटित घडले…
वडेट्टीवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकार ओबीसीविरोधी धोरण राबवत असून समाजाची कुचंबणा करीत आहे, अशी टीका येथे केली होती. या टीकेचा फुके यांनी समाचार घेतला. ओबीसी मंत्री असताना वडेट्टीवार ओबीसी समाजासाठी कोणतीही ठोस योजना कार्यान्वित करू शकले नाही. ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकले नाही आणि आज ते भाजप-शिवसेना सरकारवर टीका करत आहेत. स्वत:च्या कार्यकाळात काहीही काम न केलेल्या या माजी मंत्र्यांना भाजप-शिवसेना सरकारवर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, अशा शब्दात फुके यांनी वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिले.