नागपूर : सोनेगाव तलावाशेजारी वर्षभरापूर्वी बांधलेले उद्यान बंद का, असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे. राज्य सरकारच्या निधीतून महापालिकेने भोसलेकालीन सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू केले आहे. यासाठी २०१९ मध्ये पहिल्या टप्प्यात १७.३२ कोटी रुपये देण्यात आले. यातून तलावाच्या सर्व बाजूने पदपथ तयार करण्यात आले. तसेच काही ठिकाणी सुरक्षा भिंत बांधण्यात आली. पर्यटनला चालना मिळावी म्हणून या तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. उद्यान विकसित झाले आहे.
परंतु वाहनतळ परिसर आणि मुख्य प्रवेशद्वाराचे काम अजूनही सुरू आहे. लहान मुलांसाठी खेळणी तसेच नागरिकांसाठी ग्रीन जिमची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी शौचालय व उद्यान व्यवस्था तसेच रोशनाईची व्यवस्था झाली आहे. सोनेगाव तलाव सौदर्यीकरण प्रकल्प टप्पा २ अंतर्गत तलावाच्या दक्षिण, पश्चिम व पूर्व भागातील परिघीय विकास कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
निधी देण्याच्या प्रस्तावास ७ नोव्हेंबर २०२३ ला मान्यता देण्यात आली. टप्पा-२ अंतर्गत २४.९६ कोटी देण्यात आले. हा निधी ३१ मार्च, २०२४ पर्यंत खर्च करायचा होता आणि मंजूर कामे तात्काळ पूर्ण करायची होती. परंतु वाहनतळ परिसर आणि मुख्य प्रवेशद्वाराचे काम अजूनही सुरू आहे. वर्षभरापूर्वी उद्यानात विकसित करण्यात आले. लहान मुलांसाठी खेळणी लागली. पण, या सुविधांचा लाभ नागरिकांना घेत नसल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हवे तर प्रवेश शुल्क घ्या
उद्यान वर्षभरापासून तयार झाले आहे. पण, ते वापराविना पडून आहे. उदघाटन करून उद्यान सुरू करा. हवे तर प्रवेश शुल्क घ्या. परंतु करदात्याच्या पैशातून विकसित झालेले उद्यान लवकरात लवकर सुरू करा. – अरुण इंगळे, सहकारनगर.
विनाकारण बंद
उद्यानाचे काम झाले आहे. विनाकारण बंद ठेवून काहीच उपयोग नाही. स्थानिकांना फिरण्यासाठी तातडीने उद्यान सुरू करण्यात यावे. – शोभा सायखेडकर, सहकारनगर.