आत्महत्या करणारे ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या नव्या डायरीतील काही उल्लेखांवरून विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हे प्रकरण या अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे.
परमार यांच्या डायरीतील ‘ईके’ आणि ‘ईएस’ असे शब्द आहेत. याचा संबंध महसूलमंत्री एकनाथ खडसे (ईके) आणि शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (ईएस) यांच्याशी आहे. या दोन्ही नेत्यांनी याबाबत खुलासा करावा तसेच राज्याचे गृहमंत्री म्हणूनही मुख्यमंत्र्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारणा केली असताना त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, परमार यांच्याकडे सापडलेली डायरी दीड वर्षांपूर्वीची आहे. त्यात सापडलेल्या पत्रातील उल्लेखावरून कारवाई सुरू आहे.
तेव्हा विरोधी पक्षाने पुराव्यानिशी आरोप करावेत. एकनाथ खडसे यांनीही विखे पाटलांवर पलटवार करताना ते ‘ईके’ आहे की विखे आहे याचा शोध घ्यावा, असे आव्हान विखे पाटलांनाच केले.
या प्रकरणाशी माझा दुरान्वयेही संबंध नाही, विरोधी पक्षाने आरोप सिद्ध केले तर आपण राजकीय संन्यास घेऊ, सध्या माझे नाव घेण्याची फॅशनच विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आली आहे, असे खडसे म्हणाले.
उर्वरित दोन नगरसेवकांनाही पोलीस कोठडी
परमार यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांना शरण आलेले आरोपी नगरसेवक हणमंत जगदाळे व नगरसेवक सुधाकर चव्हाण या दोघांनाही रविवारी सकाळी ठाणे न्यायालयाने १४ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन आरोपींना शनिवारी छातीत दुखत असल्यामुळे मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तिथे त्यांची प्रकृती ठीक असल्याचा वैद्यकीय अहवाल येताच पोलीसांनी दोघांना न्यायालयापुढे हजर केले. हणमंत जगदाळे व सुधाकर चव्हाण यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्याने त्यांना मुंबईतील जे. जे. रूग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यांचा वैद्यकीय तपासणी अहवाल येण्यास उशीर होणार असल्याने पोलिसांनी चौघांपैकी नजीब मुल्ला व विक्रांत चव्हाण या दोघांनाच शनिवारी न्यायालयात हजर केले होते.
‘ती’ आत्महत्या कौटुंबिक कारणातून
कैलास बाळासाहेब खिस्ते यांनी कौटुंबिक कारणावरून आत्महत्या केली आहे, असा खुलासा पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी केला. खिस्ते हे लोणीकर यांचे मेहुणे आहेत. खिस्ते यांच्या आत्महत्येवरून विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली होती. शेजाऱ्यांनी पोलिसांकडे चुकीची माहिती दिल्याने नापिकीमुळे आत्महत्या केल्याची नोंद झाली असा दावा लोणीकर यांनी केला.