एका ७० वर्षीय वृध्देला अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी एक पोपट १५ दिवसांपासून वन कोठडीत शिक्षा भोगत आहे. हा पोपट आकाशात सोडण्यासाठी सक्षम आहे की नाही, तसेच या पोपटाच्या मानसिक स्वास्थ्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी केली जात आहे. हा पोपट मानसिकदृष्टय़ा तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच त्याला मोकळ्या हवेत सोडणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, ही संपूर्ण प्रशासकीय कारवाई बघून सामान्य माणसाची मती गुंग होणारी आहे.
राजुरा येथील भाऊराव वाटेकर यांच्याकडील रावण जातीचा हा पोपट बोलण्यात पटाईत आहे. वाटेकर यांच्या शेजारी जनाबाई डोनारकर या ७० वर्षीय वृध्देचे वास्तव्य आहे. वाटेकर व डोनारकर या दोघांचे आपसी वैर आहे. त्यामुळे वाटेकर यांनीच या पोपटाला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्याची शिकवण दिली, असा या वृध्द महिलेचा आरोप. गेल्या दोन वर्षांंपासून हा पोपट त्यांना शिवीगाळ करीत होता. जनाबाई घरासमोरून गेली की, पोपट अश्लील भाषेत शिवीगाळ करून टोमणे मारणे सुरू करायचा. या त्रासाला कंटाळून शेवटी जनाबाईने राजुरा पोलिस ठाण्यात पोपटाविरुध्द तक्रार दाखल केली. दरम्यान, शिवीगाळीचे विचित्र प्रकरण बघून ठाणेदार डोंगरे यांनी पोपटाला पोलिस ठाण्यात ठेवून घेतले. मात्र, ठाण्यात काहीही केल्या पोपट शिवीगाळ करत नव्हता. शेवटी, पोपटाला वनखात्याच्या स्वाधीन करण्यात आले. राजुराचे वनपरिक्षेत्र अधिकारी हजारे यांनी त्याला १७ ऑगस्टला वन कार्यालयात आणले तेव्हापासून तो वनखात्याच्या अंधार कोठडीत शिक्षा भोगत आहे. पोलिस दल किंवा वनखाते पोपटाने शिवीगाळ केल्याचे सिध्द करू शकले नाही. पोपटाचा गुन्हा सिध्द झाला नसतांनाही तो १५ दिवसांपासून वन कोठडीत शिक्षा भोगत आहे. दरम्यान, या पोपटाला मोकळ्या हवेत सोडण्यासाठी वनखात्याच्या वतीने कागदोपत्रांची कारवाई पूर्ण केली जात आहे. त्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत मानसिक आरोग्य तपासणी केली जात असल्याची माहिती देताच धक्काच बसला. हा पोपट शिवीगाळ करत असल्यामुळेच त्याच्या मानसिक स्वास्थ्याची आरोग्य तपासणी केली जात असल्याची माहिती वनखात्याकडून देण्यात आली. एखाद्या पोपटाची वनखात्याकडून मानसिक आरोग्य तपासणी केली जात असल्याचा हा पहिलाच आणि तेवढाच धक्कादायक व सर्वसामान्यांची मती गुंग करणारा प्रकार आहे. या संदर्भात राजुराचे वनपरिक्षेत्र अधिकारी हजारे यांना विचारणा केली असता अशी तपासणी सुरू असल्याची माहिती त्यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. पोपटाला मोकळ्या हवेत का सोडले नाही, असे विचारले असता, संपूर्ण आरोग्य तपासणी झाल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने पोपटाचे स्वास्थ्य ठीक असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतरच त्याला सोडण्यात येईल, असेही हजारे म्हणाले. सध्या राजुरा वन विभाग विकासात्मक कामांकडे लक्ष देण्याऐवजी एका पोपटावर लक्ष ठेवून आहे. पोपटाच्या दिवसभराच्या प्रत्येक हालचालींवर वनखाते लक्ष ठेवून आहे. वनखात्याचा हा सर्व प्रकार सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा