भंडारा : साकोली शहरातील सर्वात जूनी ब्रिटिशकालीन राजवटीतील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेतील जीर्ण इमारतीच्या स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणत्याही विद्यार्थ्याला इजा झाली नाही, मात्र मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच येथील लोकप्रतिनिधींनी शाळेकडे धाव घेतली आणि या प्रकरणी तात्काळ जिल्हा परिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
गणेश वॉर्ड येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्रं. १ शाळेची आज दि. १० जुलैला नेहमीप्रमाणे १० वाजता घंटा वाजली. नित्याप्रमाने येथे प्रार्थना १०:३० ला होते. पाऊस पडत असल्यास ही प्रार्थना इमारतीच्या उजव्या बाजूला वरांड्यात होते. प्रार्थना १० ते १५ मिनिटे चालली. दरम्यान प्रार्थना आटोपून वर व्हरांड्यातून मुले वर्गात जाण्याच्या तयारीत असताना सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान व्हरांड्यातील स्लॅब कॉक्रीटचा भला मोठा भाग अचानक कोसळला. विद्यार्थी पटांगणातच असल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही मात्र मूल वर्गात जात असती तर अनर्थ झाला असता.
यापूर्वीही याच शाळेचा वर्गखोल्यातील जीर्ण भाग कोसळला होता. शाळेला वर्ग १ च्या बाजूला तर भले मोठे भगदाड पडले आहे. काही वर्गखोल्यांना तडे गेले आहेत. या गंभीर आणि विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या प्रकारानंतर पंचायत समिती शिक्षण विभागाकडे अनेक तक्रारी केल्या गेल्या आहेत. तरीही प्रशासनाला याचे गांभीर्य नाही. अनेक पालकांची हीच खंत आहे.
घटनेची माहिती मिळताच येथील माजी नगरसेवक अॅड. मनिष कापगते व डॉ. गजानन डोंगरवार यांनी शाळेत जाऊन या अतिसंवेदनशील प्रकरणावर शासनाकडे या घटनेची चौकशी करून येथे जीर्ण इमारतीच्या वर्गखोल्यांतील मेन्टेनन्स बांधकाम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. वर्गखोल्यांसाठी आलेला निधी परत का गेला? याचीही गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
झालेल्या घटनेनंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश कोवे, उपाध्यक्ष लिना चचाने, सदस्य आशिष चेडगे, रवि भोंगाणे, हेमंत भारद्वाज, अमित लांजेवार, रामदास आगाशे यांनी हा विषय उचलला असून या पावसामुळे भविष्यात अशी काही घटना घडल्यास आणि त्यात प्राणहानी झाल्यास प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.