लोकसत्ता टीम
नागपूर : शहरातील महाल-गांधीगेट परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबचे छायाचित्र आणि प्रतिकात्मक कबर जाळली. त्यावर हिरव्या रंगाची चादर असल्यामुळे शहरात दंगल उसळली. या दंगलीत दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. परिस्थितीतीला नियंत्रित करताना पोलिसांवरही दगडफे करण्यात आली. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी सोमवारपासून शहरातील ११ परिसरात संचारबंदी (कर्फ्यू) लागू करण्यात आली होती. मात्र, दंगलीच्या पाचव्या दिवशी गुरुवारी पोलीस आयुक्तांनी ११ पैकी नऊ भागातील संचारबंदी शिथिल केली आहे. तर उर्वरित तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी अद्यापही कायम आहे.
गांधीगेटसमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर विश्वहिंदू परिषद, बजरंग दलाच्यावतीने जवळपास २५० कार्यकर्ते एकत्रित येऊन औरंगजेबची कबर हटविण्याची मागणी घेऊन आंदोलन केले होते. त्या दरम्यान ‘औरंगजेबाची कबर हटाव’ असे नारे देऊन औरंगजेबाचा फोटो तसेच त्यामध्ये हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये (गवताचा पेंडा भरून असलेली) प्रतिकात्मक कबर जाळली. गणेशपेठ पोलीस ठाणे हद्यीत भालदारपुरा येथे संध्याकाळी आठ वाजता विशिष्ट समाजातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गैरकायद्याची मंडळी जमवून पोलीसांवर दगडफेक केली व तणावाचे वातावरण निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे जिवीतास धोका निर्माण होऊन सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण झाली होती.
या घटनेच्या अनुषंगाने व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ कलम १६३ (१) (२) (३) प्रमाणे नागपूर शहरातील परिमंडळ क्र. ३ हद्यीतील पोलीस ठाणे कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर या भागास तसेच परिमंडळ ४ मधील सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा या भागात व परिमंडळ ०५ मधील यशोधरानगर, कपीलनगर, या परिसरात संचारबंदी (कर्फ्यू) लागू करण्यात आली होती. सार्वजनिक परिस्थितीचा विचार करून सार्वजनिक हिताचे दृष्टीने व कायदा व सुव्यवस्था बघता काही भागातील संचारबंदी हटविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या परिसरातील संचारबंदी उठवली
- गुरुवारी दुपारी दोन वाजतापासून परिमंडळ ०४ हद्दीतील नंदनवन व परिमंडळ पाचमधील कपीलनगर या ठिकाणची संचारबंदी (कर्फ्यू) पूर्णतः उठविण्यात येत आहे.
- परिमंडळ ०३ मधील लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, परिमंडळ ०४ मधील सक्करदरा, इमामवाडा, परिमंडळ ०५ मधील यशोधरानगर या हद्दीतील संचारबंदी (कर्फ्यू) परिसरातील लोकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू प्राप्त करता याव्यात व जनजीवन सुरळीत राहावे याकरीता परिस्थितीचा आढावा घेवून दिनांक गुरुवारपासून दुपारी दोन ते चार वाजताच्या कालावधीकरीता संचारबंदी शिथील करण्यात येत आहे. सायंकाळी चार वाजतापासून पुढे संचारबंदी पूर्ववत अंमलात राहील.
- परिमंडळ ०३ मधील कोतवाली, तहसील व गणेशपेठ येथील संचारबंदी (कर्फ्यू) पुढील आदेशापर्यंत ‘जसाचा तसा’ कायम सुरू राहील.
- नागपूर शहरातील परिमंडळ ३, ४, ५ मधील नमूद पोलीस ठाण्याकडे येणारे मार्ग कायदा व सुव्यवस्था बघता बंद करण्याचे अधिकार, व आदेश अंमलबजावणी करण्याचे अधिकार नेमण्यात आलेल्या पोलीस अधिकारी यांना राहतील.
- या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ अन्वये शिक्षेस पात्र राहील.
यांना संचारबंदीत सूट
- शहरात कोणत्याही भागात तैनात असलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आणि शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यातून सूट देण्यात आली आहे.
- अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली
- विविध विभागाच्या परिक्षा देणारे विद्यार्थी, परिक्षेशी संबंधित प्राध्यापक-शिक्षकांना सूट देण्यात येईल
- अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी यांना सूट दिली जाईल