चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रावत यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी काँग्रेस पक्षांतर्गत आता चांगलीच सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. चंद्रपूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रामू तिवारी यांनी केलेल्या बँकेच्या सर्व संचालकांच्या ‘नार्को टेस्ट’च्या मागणीनंतर आता राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी रामू तिवारी यांना काँग्रेस संस्कृती जपण्याचा सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार सुभाष धोटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे, की विपरीत वागून पक्षांतर्गत शांतता व शिस्तभंग करण्याचे काम कोणीही करू नये. जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या गोळीबार प्रकरणात सर्वांनी संवेदनशील वागले पाहिजे. हा हल्ला पक्षातीलच एका ज्येष्ठ पदाधिकारी, जि.प.चे माजी अध्यक्ष व पक्षाचे वर्चस्व असलेल्या स्थानिक जिल्हा बँकेच्या अध्यक्षावर झाला आहे. याचे गांभीर्य ओळखून पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांनी पक्षातच घरचा आहेर देऊ नये व स्वतःची तथा पक्षाची संस्कृती घालवू नये. आरोपीचे पक्षातील पद काढून, त्याच्या कृत्याचा जाहीर निषेध करून नार्को टेस्टची मागणी करायला हवी असताना जिल्हा बँकेतील संचालकांनाच दोषी ठरवणारी मागणी करणे म्हणजे पक्षाला घरचा आहेर देणे होय. विषयाच्या गांभीर्याला बगल देण्यासाठी केलेली ही मागणी आहे. त्यांचा आरोपीला समर्थन असल्याचा हा एक पुरावा आहे. रामू तिवारी हे इतर पक्षातून काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यांना पक्षाची शिस्त व संस्कृती माहीत नाही. पक्षातील पदाधिकारी असे वक्तव्य व कृत्य करीत असेल तर अशा पक्षविरोधी पदाधिकाऱ्यांना पक्षात ठेवायचे की नाही, याचा विचार पक्षाला करावा लागेल, असा इशाराही आमदार धोटे यांनी दिला आहे.

हेही वाचा – यवतमाळ : भर उन्हाळ्यात ३० ते ४० फूट उंच कारंजे उडाले!

यादवची पदावरून हकालपट्टी

रावत यांच्यावर राजवीर यादव याने गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे यादव याची उत्तर भारतीय विभागाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा उत्तर भारतीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री यांनी त्याला पदावरून हटवण्यात येत असल्याचे पत्र जारी केले आहे. दरम्यान, राजवीर यादव व अनुप यादव या दोन बंधूंनी संतोष रावत यांना ठार मारण्याकरिता वापरलेले अग्निशस्त्र व चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. यादव भांवडांना पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Party culture should be preserved without making baseless accusations congress mla dhote advice to tiwari rsj 74 ssb