लोकसत्ता टीम
नागपूर : पक्षाच्या अडचणीच्या काळात २०१८ मध्ये अनेक जन साथ सोडत होते, त्यावेळी प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी आल्यानंतर वेगवेगळ्या यात्रांच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर दौरे करून पक्षाला बळकट केले. अशा निष्ठावंत जयंत पाटील यांच्याविरुद्ध माध्यमांना हाताशी धरून काहींनी त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे प्रदेश प्रवक्ता प्रवीण कुंटे-पाटील यांनी केला आहे.
९ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राज्यस्तरीय विस्तारीत कार्यकारिणी बैठक पार पडली. बैठकीनंतर बहुतांश प्रसार माध्यमांनी जयंत पाटील यांना प्रदेश अध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी केली असे निराधार वृत्त पसरवले. वस्तुतः केवळ दोन-तीन पदाधिकारी वगळता या विषयाला कुणी साधा स्पर्श देखील केला नव्हता. कुणीतरी जाणीवपूर्वक माध्यमांना हाताशी धरून जयंत पाटील यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा-“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…
पक्ष सत्तेत आल्यावर करोनाच्या लाटेत तोंडावर मास्क लावून आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा काढली व त्याचे माध्यमातून त्यांनी राज्यातील प्रत्येक मतदार संघात जाऊन शरद पवार साहेबांचे विचार मानणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांची भेट घेतली. जेव्हा काही लोकांनी पक्षाची विचारधारा सोडून सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या संघर्षाच्या काळात देखील जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या विचाराशी व जनतेप्रती आपली निष्ठा राखून त्यांना खंबीरपणे साथ दिली.
आणखी वाचा-गडचिरोली : धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
मागील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राज्यभर १०४ जाहीर सभा घेऊन पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले. २०२४ चे विधानसभेत सुध्दा पूर्ण राज्य पिंजून काढून ७५ सभा घेतल्या. अशा निष्ठावंत नेत्याबद्दल प्रसार माध्यमातून उलट सुलट बातम्या प्रकाशित करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा काही दिवसांपासून जो प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते व्यथित झाले आहे. लोकनेते दिवंगत राजाराम बापु पाटील व पदमविभूषण शरद पवार यांच्या विचाराचा वारसा घेऊन चालणारे जयंत पाटील यांनी आपली निष्ठा आपल्या कर्तव्याशी, नेत्याशी विचारांशी जपली आहे. त्यामुळे पाटील यांच्याबाबतच्या वृत्तांचे आपण खंडन करीत आहोत, असे कुंटे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.