चंद्रपूर : मृद व जलसंधारण विभागातील कंत्राट मिळवण्यासाठी बनावट व खोट्या कागदपत्रांच्या आधारे १५ कोटींपेक्षा अधिकचे आर्थिक व्यवहार दाखवून १ कोटी ३० लाख ४७६ रुपयांनी शासनाची फसवणूक करणारे चंद्रपूर एरिगेशन वेलफेअर असोसिएशनचे सचिव परवेश सुभान शेख यांच्याविरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच त्यांना काळ्या यादीत टाकून बयाना ठेव (ईएमडी) व सुरक्षा ठेव (एसडी) जप्त करण्याची शिफारस जिल्हा जलसंधारण अधिकारी निलिमा मंडपे यांनी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी तथा अधिक्षक अभियंता, नागपूर यांच्याकडे केली आहे. दरम्यान, आर्थिक उलाढालीची बनावट कागदपत्रे तयार करणारे सनदी लेखापाल नरेंद्र भोयर आणि अरुण राऊतमार यांच्याही अडचणी वाढल्या आहेत.
परवेश शेख याने मृद व जलसंधारण विभागात कंत्राट मिळवण्यासाठी खोट्या व बनावट कागदपत्रांचा आधार घेतला. बनावट कागदपत्रांच्या आधारे ई-निविदा भरून शासकीय कंत्राटातून आर्थिक लाभ घेत शासनाची फसवणूक केली. त्याने सनदी लेखापालच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार केलीत. त्यावरून ५ वर्षांत १५ कोटी ७६ लाख ५२ हजार २३४ रुपयांपेक्षा अधिकची आर्थिक उलाढाल दाखवली. या कागदपत्रांच्या माध्यमातून आर्थिक क्षमता वाढवून त्याने कंत्राट मिळवले.
हे ही वाचा…नागपूर: बदनाम वस्तीतील पोलीस चौकीत हे काय सुरू आहे?
परवेश शेख याने जिल्हा जलसंधारण अधिकारी मंडपे आणि कार्यालयातील लेखापाल संदीप जेऊरकर यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. मंडपे यांनी या सर्व प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात केल्यानंतर कंत्राटदार शेख विरोधात गन्हा दाखल करण्यातआला. यानंतर मंडपे यांनी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी तथा जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता, नागपूर यांना लेखी अहवाल पाठवून कंत्राटदार शेख याला काळ्या यादीत टाकून ‘ईएमडी’ व ‘एसडी’ जप्तीची कारवाई करावी, अशी शिफारस केली आहे.
हे ही वाचा…आमदार राजकुमार पटेल ‘प्रहार’ सोडणार?… बच्चू कडू स्पष्टच बोलले….
दोन्ही सनदी लेखापालांची चौकशी होणार
खोटी कागदपत्रे तयार करण्यात परवेज शेख मदत करणाऱ्या भोयर आणि राऊतमार या दोन्ही सनदी लेखापालांची चौकशी होणार आहे. कंत्राटदार शेख याने सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गतची अनेक कामे घेतली आहेत. मंडपे यांनी त्या कामांची कागदपत्रे मागवली आहेत.