लोकसत्ता टीम
वाशिम: वाशिम वरून थेट मुंबई जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातच नव्याने सुरू झालेली नांदेड पूर्णा – वाशीम – अकोला – नाशिक – मुंबई लोकमान्य टिळक एक्सप्रेस सोईची होईल, अशी आशा प्रवाशांना होती. परंतु, अल्पावधीतच या रेल्वेची सेवा विस्कळित होत चालली असून रात्री तब्बल दोन तास विलंबाने ती धावली. त्यामुळे गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागला असून याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
आठवड्यातून दोन दिवस वाशीममार्गे मुंबई जाण्यासाठी नांदेड मुंबई लोकमान्य टिळक एक्सप्रेस गाडी सुरू झाली. सुरवाती पासूनच गाडीची वेळ चुकीची असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त होत होती. सोमवारी रात्री १ वाजता वाशिम रेल्वे स्टेशन वर येणारी लोकमान्य टिळक मुंबई एक्सप्रेस रात्री ३ वाजता दाखल झाली. मागील महिन्यात तर रात्री येणारी गाडी थेट सकाळीच पोहचली होती. गत काही दिवसापासून या गाडीची सेवा कमालीची ढेपाळली आहे. यामुळे वेळेत मुंबई पोहचणे प्रवाशांना त्रासदायक होत चालले आहे.
हेही वाचा… अमरावती: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फेकला विभागीय आयुक्तालयात कापूस
वाशिम रेल्वे स्टेशन येथे गाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना माहिती व्हावी, यासाठी इंडिकेटर लावले आहेत. परंतु, ते बंद असतात. त्यामुळे प्रवाशांना विविध अडचणीचा सामना करावा लागतो. यासह इतर काही समस्या असून त्या सोडविण्याची मागणी होत आहे.