लोकसत्ता टीम
नागपूर : रेल्वेगाडीची प्रतीक्षा करीत असलेल्या प्रवाशांना बॅटरी कारची धडक बसली. यात दोघे जखमी झाले. ही घटना नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. या अपघातात अकोला येथील रहिवासी आतिफ (२५) आणि एक वृद्ध जखमी झाले. आतिफ यांच्या बहिणीचे बुधवारी सायंकाळी अकोला येथे लग्न होते. त्यासाठी ते मंगळवारी नागपुरात राहणाऱ्या विवाहित बहिणीला घेऊन जाण्यासाठी आले होते.
आणखी वाचा-काशीला निघालेली ८२ वर्षाची महिला रेल्वेतून खाली उतरली अन्…
आज सकाळी आतिफ, त्यांची बहीण, बहिणीचा पती रेल्वेस्थानकावर आले. त्याचवेळी प्रवाशांना फलाट क्रमांक एककडे घेऊन जाणाऱ्या बॅटरी कारने त्यांना धडक दिली. यात आतिफ यांच्या पायाला गंभीर इजा झाली. तसेच, आणखी एक वृद्ध जखमी झाला. रेल्वे कुली संघाचे अध्यक्ष अब्दुल मजीद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आतिफ यांना उचलून रेल्वे स्टेशनवरील प्राथमिक उपचार केंद्राला नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना रुग्णालायात नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आतिफ आणि जखमी वृद्ध या दोघांनाही मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. अकोल्यात बहिणीचे लग्न आणि भाऊ रुग्णालयात अशी विचित्र स्थिती निर्माण झाली.