नागपूर : नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी मध्यवर्ती स्थानकानंतर प्रवाशांची सर्वाधिक पसंती रेल्वे स्थानकाजवळील मेट्रो स्थानकाला मिळत आहे. नुकतीच दिवाळी संपली. या काळात बाहेरगावहून नागपूरला रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली होती. तसेच नागपूरहून बाहेरगावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर येणाऱ्यांचीही गर्दी वाढली होती. या प्रवाशांनी त्यांच्या गंतव्य ठिकाणी जाण्यासाठी मेट्रोचा वापर केल्याचे दिसून आले आहे.
प्रवाशांच्या सुविधेसाठी मेट्रोतच रेल्वेस्थानकापर्यंत कसे जायचे या संदर्भात प्रवाशांना सूचना देण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच मुख्य रेल्वे स्थानकाच्या बाहेरच मेट्रोचे स्थानक आहे. त्यामुळे रेल्वेने नागपूरला आल्यावर मेट्रोचा वापर सहज शक्य झाला आहे. या परिसरात असलेला महात्मा फुले भाजी बाजार, फळ बाजार, रेल्वे कॉलोनी तसेच परिसरातील वस्तीतील नागरिक मेट्रोचा वापर करू लागले आहेत, असा दावा महामेट्रोने केला आहे.
हेही वाचा – रेल्वे स्थानकावर विद्यार्थिनी, महिलांशी गैरवर्तन; रेल्वे विलंबामुळे…
नागपूरचे उपरेल्वे स्थानक अजनीला मेट्रोशी संलग्न करण्यात आले आहे. येथे रेल्वे स्थानकाचा पहिला फलाटच मेट्रो स्थानकाला जोडला आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रोस्थानकातून या फलाटावर तसेच फलाटावरून मेट्रो स्थानकावर जाणे सुकर झाले आहे, असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.