छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अमरावती दरम्यान बारमाही प्रवासी आणि संपूर्ण आरक्षण लाभलेल्या अमरावती-मुंबई एक्स्प्रेसच्या डब्यांच्या रचनेमध्ये बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतल्याने सामान्य प्रवाशांवर तिकीटांचा तिप्पट भार पडणार आहे. नव्या रचनेत शयनयान डब्यांची संख्या तब्बल सातने घटवण्यात आली असून वातानुकूलित (एसी) डब्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. या बदलामुळे सर्वसामान्यांचा प्रवास महागणार आहे. प्रवाशांनी या विरोधात ‘रेल रोको’ आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हेही वाचा- गडकरी यांनी दिला कच-यापासून संपत्ती निर्मितीचा मार्ग; म्हणाले, तासापासून डांबर आणि ..
अमरावती -मुंबई एक्स्प्रेस ही प्रवाशांच्या प्रथम पसंतीची रेल्वेगाडी आहे. शयनयान, तृतीय एसी, द्वितीय एसी आणि प्रथम एसी या सर्व वर्गालाही प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद लाभतो. गाडी क्रमांक १२११२ अमरावती-मुंबई एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात येणार आहेत. अमरावती एक्सप्रेस २१ डब्यांची आहे. त्यापैकी ९ डबे स्लीपर क्लासचे असून तीन डबे सामान्य, प्रथम श्रेणी एसीचा १, २ टियर एसीचे दोन आणि ३ टियर एसीचे सहा डबे आहेत. नऊपैकी शयनयान श्रेणीचे सात डबे एसी श्रेणीमध्ये बदलले जाणार आहे. द्वितीय, तृतीय आणि एम-वन श्रेणीचे प्रत्येकी दोन आणि प्रथम एसीचा १ अशी त्यांची विभागणी आहे.
हेही वाचा- विद्युत जोडणी कापल्यामुळे धान उत्पादक संतप्त
या विरोधात ‘रेल रोको’ आंदोलनासाठी महानगर यात्री संघाने पुढाकार घेतला असून येथील स्टेशन प्रबंधक ते थेट केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्यापर्यंत त्यांनी पत्रव्यवहारही केला आहे. यात्री संघाचे अध्यक्ष अनिल तरडेजा हे या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. त्यासाठी व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी, शेतकरी, महिला, युवक आदींची मोट बांधण्याची तयारी त्यांनी सुरु केली आहे. सरकारला दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यासाठीचे एक पत्र तरडेजा यांच्या नेतृत्वातील प्रतिनिधीमंडळाने रेल्वे प्रशासनाला सोपविले आहे.
हेही वाचा- संजय राऊत यांचे आरोप खोटे व तथ्यहीन; शिवसेना म्हणते, ‘गुन्हे दाखल करा…’
अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ही सर्वसामान्यांच्या सोयीची गाडी आहे. या गाडीत वातानुकूलित डबे वाढवून काय साध्य होणार, ज्यांना वातानुकूलित प्रवास सहन होत नाही, अशा प्रवाशांनी जायचे कुठे, हा प्रश्न आहे. वातानुकूलित डब्यांची संख्या जर रेल्वेला वाढवायची असेल, तर दुसरी एसी एक्स्प्रेस सुरू करावी, असे महानगर यात्री संघाचे अध्यक्ष अनिल तरडेजा यांचे म्हणणे आहे.