नागपूर : भूमिपूजनानंतर दहा वर्ष रखडलेला योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली उद्योग समुहाच्या संत्री प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदेवबाबा यांच्या उपस्थित रविवारी नागपुरात पडले. हा समारंभ लक्षात राहिला तो रामदेवबाबांनी गडकरी, फडणवीस यांच्यावर उधळलेल्या स्तुतीसुमनांमुळे. बाबांनी तर गडकरी, फडणवीस ‘ युगपुरुष ‘ असल्याचे जाहीर करून टाकले.

नागपूरच्या मिहान क्षेत्रात रामदेवबाबा यांच्या उद्योग समुहाला २०१४- ३०१९ या दरम्यान भाजपचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत्री प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा दिली होती. अनेक वर्षे तो रखडला, त्यामुळे टीकाही झाली. मधल्या काळात दोन मुख्यमंत्री बदलले, आता पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले. अखेर हा प्रकल्प पूर्ण होऊन त्याचे रविवारी उद्घाटन झाले. या कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी गडकरी फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले. गडकरीबाबत बाबा रामदेव म्हणाले ‘ गडकरी बडेभाई हे, गौरव पुरूष, युगपुरुष है! है! बाबांनी गडकरींच्या रस्ते बांधणी क्षेत्रांतील कामाचाही उल्लेख केला. देश में जहावंहा रस्ते,हायवे के काम चालू हे! वह राष्ट्रपुरुष है, असे ते म्हणाले.

बाबा या कार्यक्रमात खुप आनंदी दिसले. त्यांचा व्यासपीठावरील वावर हे त्याचे प्रतिक ठरले. हाती माईक घेऊन तेच स्वतः कार्यक्रमाचे संचालन करीत होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना त्यांनी त्यांच्यासाठी ‘ शौर्य पुरुष ‘ हा शब्द प्रयोग कैला. जयभवानी – जय शिवाजी अशा घोषणाही दिल्या. दरम्यान बाबांच्या कौतुकाने भारावलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेवबाबा यांच्यामुळेच हा प्रकल्प शक्य झाला असे सांगून रामदेवबाबाचे आभार मानले. माझ्याहस्ते उद्घाटन व्हावे यासाठीच रामदेवबाबा मी पुन्हा मुख्यमंत्री होईपर्यंत थांबले, असे फडणवीस म्हणाले.

विदर्भात संत्रा उत्पादन वाढण्याची आवश्यकता -गडकरी

पतंजलीतर्फे दररोज ८०० टन संत्र्यावर प्रक्रिया होणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर संत्रा पुरविण्यासाठी विदर्भात संत्र्याचे एकरी उत्पादन वाढण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. पतंजलीच्या मिहान स्थित फूड आणि हर्बल प्रकल्पासाठी दिवसाला जवळपास ८०० टन संत्र्यांची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला आपसूकच बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार असल्याचेही गडकरी म्हणाले. या प्रकल्पास शेतकऱ्याचे पूर्ण सहकार्य लाभेल व लिंबुवर्गीय फळांचा पुरवठाही करण्यात येईल. या प्रकल्पाद्वारे शेतकरी समृद्ध होण्यास मदत होईल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.  

Story img Loader